गटविकास व वैद्यकीय अधिकारी आल्यावर कामकाज सुरळीत
गुहागर, ता. 2 : 18 ते 44 वयोगटातील लसीकरण (18 to 44 age group Vaccination) शहरात सुरु झाले. त्यावेळी वय वर्ष 45 वरील काही ग्रामस्थांना लस दिली. मात्र अचानक उर्वरित 45 वर्षावरील नागरिकांना लस नाकारण्यात आली. त्यामुळे गुहागरच्या लसीकरण केंद्रात गोंधळ निर्माण झाला. त्यातच 18 ते 44 वयोगटाला देण्यात येणारे डोस वेगळे आहेत. असे तक्रार निवारण केंद्रातून सांगितले गेले. त्यामुळे गोंधळात अधिक भर पडली. मात्र गटविकास अधिकारी अमोल भोसले व वैद्यकिय अधिकारी डॉ. बळवंत लसीकरण स्थळी पोचले. उपस्थितांच्या शंकाचे समाधान केले. त्यानंतर लसीकरण केंद्रातील कामकाज सुरळीत झाले.
गुहागर शहरातील जि.प.शाळा क्र. 1 मध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला आज सुरवात झाली. कोविन ॲपवर नोंदणी केलेल्या 200 जणांना लस देण्याचे आजचे नियोजन होते. आज सकाळी लसीकरणाला सुरवात झाली त्यावेळी ऑनलाइन नोंदणी केलेल्या काही व्यक्तिंनाही लस देण्यात आली. ज्यावेळी एक वयोवृध्द आजी लस घ्यायला आल्या त्यावेळी तेथील परिचारिका सौ. मालप यांच्या लक्षात आले की, आजची लस केवळ 44 वर्षाखालील नागरिकांना द्यायची आहे. त्यांनी आजींना लस देण्याचे नाकारले. तसेच बाहेर लसीकरणासाठी जमलेल्यांना सूचना केली की वय वर्ष 44 खालील व्यक्तींनाच लस दिली जाईल. या सूचनेनंतर एकच गोंधळ उडाला. वय वर्ष 45 वरील उपस्थितांचे म्हणणे होते की, आम्ही ऑनलाइन नोंदणी केली आहे. आम्हाला आजची वेळ ॲपद्वारे दिली गेली आहे. लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना केवळ 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनाच लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजुंचे म्हणणे योग्य होते. परंतु तोडगा निघत नसल्याने लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले.
या घटनेनंतर वयोवृध्द मंडळींसोबत आलेल्या नातेवाईकांनी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. चरके, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथील अधिकारी, तक्रार निवारण केंद्र आदी ठिकाणी चौकशी सुरु केली. मात्र कोणाकडूनच अपेक्षित उत्तरे मिळत नव्हती.
वेगळ्या लसीमुळे गोंधळ वाढला
त्याचवेळी रत्नागिरी येथील एका तक्रार निवारण केंद्रातील कर्मचाऱ्यांने 18 ते 44 वयोगासाठी वेगळी लस असल्याचे सांगितले. त्यामुळे आणखी गोंधळ उडाला. 44 वर्षावरील लस घेतलेल्या व्यक्तींनी मग आम्हाला काही होणार नाही ना अशी विचारणा केली. या संदर्भात लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना काहीच माहिती नव्हते. त्यांना फक्त आजची लस कोविशिल्ड आहे एवढेच माहिती होते. रत्नागिरीतून वेगळी लस असल्याचे सांगितले गेल्याने 18 ते 44 वयोगटासाठी कदाचित थोडी अधिक शक्तीशाली लस असु शकते. त्याने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. असे वेगवेगळे तर्क लढवले जाऊ लागले. या तर्कांमुळे लसीकरण केंद्रावरी गोंधळात आणखी भर पडली.
अधिकाऱ्यांनी केले शंका समाधान
लसीकरण केंद्रावर सुरु असलेल्या गोंधळामुळे ग्रामीण रुग्णालय गुहागरचे वैद्यकिय अधिकारी डॉ. बळवंत आणि गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले लसीकरण केंद्रात आले. त्यांनी सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर गटविकास अधिकारी अमोल भोसले म्हणाले की, कोविन ॲपवर नोंदणी (Cowin App Registration) झाली असली तरी वय वर्ष 45 वरील व्यक्तींना या केंद्रात लस मिळणार नाही. कारण गुहागरच्या लसीकरण केंद्रावर 2 मे ते 8 मे या कालावधीत तालुक्यातील केवळ 18 ते 44 वयोगटातील ग्रामस्थांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्ष 45 वरील नागरिकांसाठी गुहागर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत लसीकरण होणार आहे. गुहागरमध्येही त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.
18 ते 44 वयोगटासाठी आणि 45 वर्षांवरली वयोगटासाठी स्वतंत्र लस नाही. फक्त एक तांत्रिक बदल आहे. 45 वर्षावरील नागरिकांसाठी मोफत लस पुरवण्याची जबाबदारी केंद्र शासनाने उचलली आहे. त्यामुळे त्या वयोगटासाठी येणाऱ्या लसी या केंद्र शासनाच्या कोट्यातून पुरवल्या जाणार आहेत. तर 18 ते 44 वयोगटासाठी मोफत लसीचे वितरण राज्य शासनाकडून होत आहे. असेही गटविकास अधिकारी अमोल भोसले यांनी सांगितले. त्यानंतर गुहागरच्या केंद्रातील लसीकरण पुन्हा सुरळीत सुरु झाले. (There is Technical Difference Between Both Vaccines. Central Government Provided Free Vaccine for Above 45 age group, and Maharashtra State Government Provided free Vaccine for 18 to 44 Age group – BDO Amol Patil