आबलोली पागडेवाडी अंगणवाडी येथे पोषण महिन्याची सांगता
गुहागर, ता. 09 : गुहागर तालुक्यातील अंगणवाडी आबलोली पागडेवाडी या ठिकाणी पोषणमाहाची सांगता बाळ गोपाळ पंगतीने करण्यात आली. यावेळी वेगळा कार्यक्रम म्हणून अंगणवाडीतील मुलांनी पौष्टिक खाद्यपदार्थाची प्रतिकात्मक हंडी फोडली. Conclusion of Nutrition Month at Aabloli
महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘सही पोषण, देश रोशन’ चा नारा देत अंगणवाड्यांमध्ये सप्टेंबर हा पोषणमाह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बालविकास प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर, बीट पर्यवेक्षिका रसिका माटल यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी आबलोली पागडेवाडी येथे पोषण माह मध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. पालकांना पोषण आहाराचे महत्त्व कळावे म्हणून घरोघरी जाऊन मूठभर धान्य योजना राबवताना पौष्टिक खाद्याविषयी माहिती देण्यात आली. किशोरवयीन विद्यार्थी विद्यार्थींना आहार, आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन डॉ. स्नेहल निवाते यांनी केले. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुण्याविषयी प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. Conclusion of Nutrition Month at Aabloli
पोषण माहाच्या निमित्ताने अंगणवाडीत पौष्टिक खाद्यपदार्थ एकत्रित करून त्यांची प्रतीकात्मक हंडी फोडण्यात आली. या हंडीतील खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी आवडीने खाल्ले. पोषण माहाची सांगता दिनी बाळगोपाळ पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पालकांनी विविध प्रकारचे पौष्टिक खाद्यपदार्थ बनवून आणले होते. त्या पदार्थांचे महत्त्व बालकांना सांगण्यात आले. सर्व बालकांनी बाळ गोपाळ पंगतीत विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. Conclusion of Nutrition Month at Aabloli
संपूर्ण पोषण महिन्याच्या यशस्वीतेसाठी सरपंच वैष्णवी नेटके, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक यांच्या सहकार्याने अंगणवाडी सेविका सुनीता पवार व मदतनीस स्वाती पागडे यांनी प्रयत्न केले. पोषण महिना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अंगणवाडी सेविका सुनिता पवार यांनी आभार मानले. Conclusion of Nutrition Month at Aabloli