कडक पोलीस बंदोबस्त, शेतीची कामे आणि नोकरदारांना सूट
गुहागर, ता. 4 : तालुक्यात शासनाच्या लॉकडाऊनला प्रतीसाद मिळाला असुन तालुक्यातील गुहागर, तळी, आबलोली, पालशेत या प्रमुख बाजारपेठेसह सर्व गावातील लहान मोठी दुकाने बंद आहेत. तर रस्त्यावरील रहदारी पुर्ण पणे बंद आहे.
आज सकाळ पासुनच पोलीस बंदोबस्त कडक आहे. तालुक्यात गुहागर, रानवी, तळी, आबलोली व पालशेत येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. तर आबलोली ते भातगाव पेट्रोलींगसाठी 3 पोलीस कर्मचारी 2 होमगार्ड, पालशेत ते तवसाळ पेट्रोलींगसाठी 1 पोलीस कर्मचारी व 1 होमगार्ड, तळवली ते पेवे पेट्रोलींगसाठी 1 पोलीस कर्मचारी व 1 होमगार्ड, गुहागर, पवारसाखरी, रानवी, असगोली पेट्रोलींगसाठी 1 पोलीस कर्मचारी व 1 होमगार्ड, तर कुटगीरी व परिसरात पेट्रोलींगसाठी 1 पोलीस कर्मचारी व 1 होमगार्ड, ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.
कंपनीत जाणारे कर्मचारी,शासकीय कर्मचारी व शेती कामासाठी जाणारे या व्यतिरिक्त पुर्णत: रहदारी बंद आहे. लसीकरण मात्र सुरळीत सुरु आहे.
गुरुवारपासून होणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 2 रोजी गुहागर व शृंगारतळी येथे तहसीलदार लता धोत्रे, पोलीस निरीक्षक अरविंद बोङके व गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले , नगरपंचायत मुख्याधिकारी कविता बोरकर यांनी व्यापारी संघटने बरोबर मिटींग घेतली. यावेळी दिनांक 3 जून ते 9 जून पर्यंत सर्व प्रकारचे व्यवसाय कडक बंद राहतील.
या 7 दिवसात कुणीही कोणत्याही परिस्थित आपले व्यवसाय चालू ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा व्यवसाय घरी करण्याचा केला तरी प्रशासना मार्फत 10000/-(दहा हजार रुपये दंड) व अनिश्चित काळासाठी दुकान सील करण्यात येईल. तरी सर्व व्यापारींना विनंती आहे की कडक बंद मधे सामिल होऊन प्रशासनाला सहकार्य करावे. अशा सूचना दिल्या होत्या.
प्रशासनाने संचारबंदी लागू केली आली आहे. कुणीही बाहेर फिरताना आढळून आल्यास त्याची कोरोना चाचणी करण्यात येईल. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्यास त्या रुग्णाची कोव्हीड सेंटर येथे रवानगी करण्यात येईल. यांची माहिती सर्व व्यापारी व कर्मचारी तसेच गुहागर बाजारपेठ येथे विनाकारण फिरणार्या लोकांना देण्यात आली आहे.