उपनगराध्यक्षांचा राजीनामा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडल्याचा परिणाम
गुहागर, ता. 04 : नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड आज झाली. मात्र उपनगराध्यक्षांनी राजिनामा दिल्याने पाणी समितीची सभापती निवड झाली नाही. तर सूचक आणि अनुमोदक देण्यासाठी संख्याबळ कमी पडल्याने महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदासाठी शहर विकास आघाडीला नामनिर्देशन पत्रच भरता आले नाही. राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या एकमात्र नगरसेविकाला शिक्षण सभापती पद देवून शहर विकास आघाडीने सत्तेत स्थान दिले. तर विवाह होवून सासरी गेल्याने नगरसेविका निलीमा गुरव यांनी सभापती पद नाकारले. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
In Guhagar Nagarpanchayat the post of chairperson for 5 subject committees was elected today. However, due to the resignation of the deputy mayor, the chairman of the water committee was not elected. Due to lack of Numbers the Shahar Vikas Aaghadi could not fill up the nomination papers for the post of chairperson of the Women and Child Welfare Committee. The Shahar Vikas Aaghadi gives Chairmanship of Education Committee to NCP corporator.


सोमवार, 4 ऑक्टोबरला गुहागर नगरपंचायतीच्या विषय समित्याच्या निवडणूक आज पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ. अमिता तळेकर धुमाळ ( उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना रत्नागिरी) यांनी काम पाहिले. त्यांना विनोद ढवळे मुख्याधिकारी (अतिरिक्त कार्यभार) गुहागर यांना साह्य केले. सोमवार, 4 ऑक्टोबरला सकाळी 10 ते दुपारी 12 या कालावधीत विषय समित्यांची संख्या निश्चित करुन त्यांची सदस्य संख्या ठरविण्यात आली. समित्यांच्या सदस्यांची नामनिर्देशन पत्रे भरुन घेण्यात आली. दुपारी 12 ते 2 या कालावधीत समितीच्या सभापती पदासाठी नगरसेवकांनी आपले उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी विनोद ढवळे यांच्याकडे सादर केले. 2 ते 2.30 या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अमिता तळेकर धुमाळ यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. सभापती पदासाठी कोणत्याच समितीमध्ये एकपेक्षा जास्त अर्ज आले नव्हते. त्यामुळे लगेचच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विषय समित्यांचे निकाल जाहीर केले.
गुहागर न्यूजची विश्र्वासार्हता सिध्द
गुहागर न्यूजने विषय समितीच्या संदर्भात 3 ऑक्टोबरला प्रसिध्द केलेल्या बातमीमध्ये राष्ट्रवादीला एक सभापती पद मिळण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच 4 ऑक्टोबरला सकाळी व्हॉटसॲप अपडेट देताना अन्य सभापती पदांसाठी नावे कोणती असू शकतात याची माहितीही वाचकांना दिली होती. इतकेच नव्हे तर आणखी एका समितीचे सभापती पद रिक्त राहु शकते याचीही माहिती दिली होती. या सर्व शक्यता सत्यात उतरल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम समिती
या समितीच्या सभापती पदी सौ. वैशाली पराग मालप यांची निवड करण्यात आली. या समितीमध्ये सौ. नेहा नितीन सांगळे, श्री. अमोल प्रताप भोसले, श्री. समीर सुधाकर घाणेकर व श्री उमेश अनंत भोसले यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.


स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती
या समितीच्या सभापती पदी श्री. प्रसाद दत्ताराम बोले यांची बिनविरोध निवड झाली. सदस्य पदी माधव तुकाराम साटले, सौ. स्नेहल सुनिल रेवाळे, श्री. गजानन शंकर वेल्हाळ आणि श्री. समीर सुधाकर घाणेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.


शिक्षण समिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर प्रभाग 1 मधून निवडून आलेल्या सौ. सुजाता बागकर यांना गेली तीन वर्ष सत्तेत स्थान देण्यात आले नव्हते. यावेळी मात्र सौ. सुजाता बागकर यांना शिक्षण समितीचे सभापती पद देण्यात आले आहे. या समितीमध्ये सौ. नेहा नितीन सांगळे, सौ. स्नेहा जनार्दन भागडे, सौ. मृणाल राजेश गोयथळे, आणि श्री गजानन शंकर वेल्हाळ यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


पाणी पुरवठा, जल:निस्सारण नियोजन आणि विकास समिती
गुहागर नगरपंचायतीमध्ये उपनगराध्यक्ष हे या समितीचे पदसिध्द सभापती असतात. मात्र उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे यांनी विषय समितीच्या निवडणुकीपूर्वीच उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अजुनही नव्या उपनगराध्यक्षाची निवड झालेली नाही. त्यामुळे या समितीचे सभापती पद सध्या रिक्त आहे. भविष्यात उपनगराध्यक्ष पदाची निवड निवडणुकीच्या माध्यमातून होईल. त्यावेळी निवड झालेले उपनगराध्यक्ष हे आपोआपच या समितीचे सभापती व स्थायी समितीचे सदस्य होतील. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अमिता तळेकर धुमाळ यांनी दिली.
सभापती पदासाठी निवडणूक झाली नसली तरी या समितीच्या सदस्यांची निवड आज करण्यात आली. या समितीमध्ये अमोल प्रताप गोयथळे, माधव तुकाराम साटले, उमेश अनंत भोसले आणि अरूण गोविंद रहाटे हे नगरसेवक आहेत.
महिला व बालकल्याण समिती
शिवसेनेने नगरपंचायतीच्या निवडणुकीचे वेळी 2018 मध्ये शहर विकास आघाडीबरोबर युती केली होती. प्रभाग क्र. 6 मधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या कु. निलिमा गुरव आल्या. युतीधर्म म्हणून शहर विकास आघाडीने सत्तास्थापनेनंतर शिवसेनेच्या कु. गुरव यांना महिला व बाल कल्याण समितीचे सभापती पद दिले होते. मे महिन्यात कु. निलीमा गुरव यांचा विवाह झाला आहे. त्यांचे सासर मुंबईत असल्याने त्या नगरपंचायतीच्या दैनंदिन कामात लक्ष घालू शकत नाहीत. म्हणून त्यांनी पुन्हा सभापती पद न न स्विकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिवसेनेकडे असलेले एकमात्र सभापती पद त्या पक्षाला गमवावे लागले आहे.
आघाडीची अडचण
आज या सभापती पदाच्या निवड प्रक्रियेत आघाडीची मोठी अडचण झाली. ही तांत्रिक अडचण आपण समजून घेवूया.
१) महिला व बाल कल्याण समितीमध्ये एकूण नगरसेवकांच्या एक चतुर्थांश नगरसेवक सदस्य असतात. गुहागर नगरपंचायतीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या 17 आहे. त्यांच्या एक चतुर्थांश म्हणजे 4 सदस्य या समितीमध्ये घ्यावे लागतात.
२) सभापती पदाचा उमेदवाराला एक सूचक आणि अनुमोदक द्यावा लागतो.
३) प्रत्येक विषय समितीसाठी सूचक आणि अनुमोदक स्वतंत्र असावा लागतो.
४) गुहागर नगरपंचायतीमध्ये एकूण 5 समित्या आहेत. त्यापैकी पाणी समितीचे सभापती हे उपनगराध्यक्ष असतात. उर्वरित 4 समित्यांसाठी सत्ताधारी पक्षाकडे प्रत्येकी 3 नगरसेवक (1 सभापती पदाचा उमेदवार, 1 सूचन आणि 1 अनुमोदक) असणे 12 संख्याबळ आवश्यक होते.
आज शहर विकास आघाडीकडे स्वत:चे 9 सदस्य, राष्ट्रवादी 1 आणि शिवसेना 1 असे 11 सदस्यच होते. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी त्यांना 1 सदस्य कमी पडला. परिणामी या समितीच्या सभापती पदासाठी शहर विकास आघाडीला नामनिर्देशन पत्र (अर्ज) भरताच आला नाही. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची निवडणूक झालीच नाही.
या समितीच्या सदस्य पदी सौ. मनाली महेश सांगळे, सौ. स्नेहल सुनिल रेवाळे, सौ. मृणाल राजेश गोयथळे आणि सौ. भाग्यलक्ष्मी महेश कानडे यांनी निवड करण्यात आली.
भाजप सत्तेतून बाहेर पडल्याचा परिणाम
भाजपचे नगरसेवक सत्तेत असते तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची निवड विनासायास झाली असती. भाजप सत्तेतून बाहेर पडल्याने आघाडीला एका सदस्याची कमतरता भासली.
स्थायी समिती
सर्व समित्यांच्या सभापती पदांची निवड झाल्यावर स्थायी समितीचे गठन करण्यात आले. नगराध्यक्ष या समितीचे पदसिध्द सभापती असतात. या समितीमध्ये बांधकाम सभापती सौ. वैशाली पराग मालप, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती श्री. प्रसाद दत्ताराम बोले आणि शिक्षण सभापती सौ. सुजाता श्रीधर बागकर हे सदस्य आहेत. उपनगराध्यक्ष आणि महिला व बालकल्याण समितीचे सभापती ही पदे रिक्त असल्याने स्थायी समितीमध्ये सध्या 3 सदस्य आहेत.