• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाराष्ट्रातील विजेच्या साम्राज्याचा शांत सेनापती…शशांक

by Guhagar News
February 26, 2026
in Articals
34 0
1
Commander of the Lightning Empire
67
SHARES
190
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रसाद चिक्षे
GUHAGAR NEWS : आपण घरातलं एक बटण दाबतो आणि क्षणात आसमंत उजळून निघतो, पण या एका सेकंदाच्या उजेडामागे हजारो किलोमीटर दूरवर चालणारी एक महाकाय ‘बौद्धिक सर्कस’ असते. जेव्हा संपूर्ण राज्य शांत झोपलेलं असतं, तेव्हा डोळ्यात तेल घालून, सेकंदाच्या शंभराव्या भागाचा हिशोब ठेवत, महाराष्ट्राची वीज-यंत्रणा कोसळण्यापासून वाचवणारा एक ‘मेंदू’ अहोरात्र कार्यरत असतो. अंबाजोगाई जवळील गिरवलीच्या मातीत पाय घट्ट रोवून, तांत्रिक अनुभवाचं बाळकडू घेतलेला एक इंजिनिअर आज युरोपपेक्षाही मोठ्या ग्रीडचा ‘ट्रॅफिक कंट्रोलर’ बनला आहे. हे केवळ एका अधिकाऱ्याचे यश नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता आणि ‘इंजिनिअरिंग मॅनेजमेंट’चा एक अद्वितीय अविष्कार आहे. पडद्यामागच्या या ‘ऊर्जा-योद्ध्याचा’ अर्थात शशांकचा हा थक्क करणारा प्रवास… Commander of the Lightning Empire

१९९९ सालचं ते वर्ष. मी अरुणाचल प्रदेशच्या शांत दऱ्याखोऱ्यांतून थेट अंबाजोगाईच्या मातीत परतलो होतो. मनात विचारांचं काहूर माजलं होतं, भविष्य कसं असेल याची धाकधूक होती आणि मन शांत करण्यासाठी एखादा आधार शोधत होतो. अशा वेळी वयाने सारखे आणि मनाला समजून घेणारे मित्र आसपास कुणीच नव्हते. पण म्हणतात ना, नशिबात काही गोष्टी आधीच ठरलेल्या असतात. मला योगायोगाने समजलं की, माझा मित्र शशांक जेवळीकर गिरवलीत कामाला आला आहे. मी वेळ न घालवता थेट गिरवली गाठलं आणि तिथून सुरू झाला एक असा प्रवास, ज्याने माझ्या आयुष्याला नवी दिशा दिली.

मैत्री आणि ज्ञान प्रबोधिनीचा घट्ट वीण
शशांक आणि गिरवली हे माझ्यासाठी केवळ एक ठिकाण किंवा व्यक्ती राहिले नाहीत, तर ते माझे हक्काचे आधारवड बनले. मनातला कोणताही प्रश्न, भीती किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी मी तिथं धाव घेऊ लागलो. ज्ञान प्रबोधिनीच्या कामाची उभारणी करताना शशांक, फाटकसाहेब आणि महेंद्राकरसाहेब आणि अनेक सहकारी पाठीशी उभे राहिले. आमच्या मैत्रीचा एक खास भाग म्हणजे आमचा एकमेकांवर असलेला निस्सीम विश्वास. या सर्वांची मुले ज्ञान प्रबोधिनीत शिकत होती, त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक कामात एक आपुलकीची वीण गुंफली गेली होती. Commander of the Lightning Empire

शशांकचं व्यक्तिमत्व विलक्षण होतं. लहान मुलांसाठी तो जसा ‘चार्ली चॅप्लिन’चे सिनेमे लावून त्यांना हसवायचा, तसाच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना यार्डमध्ये नेऊन तांत्रिक गोष्टींचे धडेही द्यायचा. मुलांना काय आणि कसं शिकवावं, याचा त्याचा दृष्टिकोन खूप स्पष्ट होता. शशांक आणि त्याचे सहकारी मला जबरदस्ती एका खोलीत बंद करायचे आणि सांगायचे, “आधी थोडी झोप काढ, मग बोलू!”. त्यानंतर मग आमची गप्पांची मैफल अशी काही रंगायची की विषयाला अंत नसायचा. पहिल्या एका तपाच्या (१२ वर्षे) प्रवासात आम्ही एकमेकांच्या संघर्षाचे आणि यशाचे साक्षीदार आहोत. शशांकने माझ्या चढ-उतारात मला जसा आधार दिला, तसाच त्याच्या प्रगतीचा प्रवास मी जवळून पाहिला आहे.

गिरवली: महाराष्ट्राच्या वीज नकाशावरचं ‘धगधगतं’ केंद्र
आपल्याला गिरवली म्हटलं की एक छोटं गाव आठवतं, पण ९० च्या दशकात हे गाव महाराष्ट्राच्या वीज व्यवस्थेचं हृदय होतं. आज राज्याच्या ‘लोड डिस्पॅच’चा प्रमुख असलेला शशांक याच गिरवलीत तब्बल १३ वर्षं राबला आणि आपल्या राज्याला अंधारात जाण्यापासून त्यानं वाचवलं. तेव्हाचं सर्वात ‘क्रिटिकल’ जंक्शन: त्याकाळी वीज विदर्भात तयार व्हायची आणि तिची मोठी ओढ मुंबई-पुण्याकडे असायची. ही वीज पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना गिरवली हे सर्वात महत्त्वाचं ‘जंक्शन’ होतं.

• विजेचा महामार्ग: चंद्रपूरहून येणारा विजेचा अफाट प्रवाह आधी गिरवलीत यायचा आणि तिथून पुढे धावायचा.
• मराठवाड्याचा आधार: तेव्हा आपल्या भागासाठी परळी थर्मल स्टेशन हे एकमेव मोठं केंद्र होतं, ज्याचं नियंत्रणही याच गिरवली केंद्राशी जोडलेलं होतं.
• महत्त्वाचा कॉरिडॉर: महाराष्ट्रात विजेचे जे ७ मुख्य मार्ग आहेत, त्यापैकी ३ मार्ग एकट्या गिरवलीतून जात होते. थोडक्यात सांगायचं तर, शशांक तिथं या वीज व्यवस्थेचा खंबीर ‘कंट्रोलर’ म्हणून उभा होता. Commander of the Lightning Empire

१०० मिलिसेकंदांचा रक्षक (Protection Expert)
शशांकने १५ वर्षांहून अधिक काळ ‘प्रोटेक्शन’ या विषयात विशेष नैपुण्य मिळवलं. हे काम नेमकं काय असतं?
सोप्या भाषेत सांगायचं तर, जसं आपल्या घरातलं फ्युज शॉर्ट सर्किट झाल्यावर उडतं आणि घरातले टीव्ही-फ्रिज जळण्यापासून वाचवतं, तसंच काम मोठ्या पॉवर ग्रीडमध्ये ‘प्रोटेक्शन सिस्टिम’ करते. ३०० किलोमीटर लांब असलेल्या चंद्रपूर-परळी लाईनवर कुठेही बिघाड झाला, तर तो डोळ्याचं पातं लवते न लवते तोच (म्हणजे एका सेकंदाच्या दहाव्या भागात!) ओळखावा लागतो. तो बिघाड वेळेत ओळखून वीज प्रवाह खंडित करण्याचं आणि संपूर्ण ग्रीड वाचवण्याचं कठीण काम शशांक आणि त्याची टीम अहोरात्र करायची.

जेव्हा तंत्रज्ञान थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचतं
आपल्या कामाचं यश कशात मोजायचं? प्रमोशनमध्ये, पगारात की मिळणाऱ्या पुरस्कारांत? महाराष्ट्राच्या वीज व्यवस्थेचा कार्यकारी संचालक असूनही शशांकसाठी याचं उत्तर खूप वेगळं आहे. त्याच्या कामाची सर्वात मोठी पावती त्याला एका सामान्य शेतकऱ्याच्या बोलण्यातून मिळाली.

लातूर-उदगीर भागात एक काळ असा होता की, विजेचा दाब (Voltage) इतका कमी-जास्त असायचा की शेतकऱ्यांना आपली मोटार आणि उपकरणं वाचवण्यासाठी १५ ते २५ हजार रुपये खर्च करून ‘हाय-लेव्हल रेग्युलेटर्स’ विकत घ्यावे लागायचे. शशांकने जेव्हा मराठवाड्यातील या ‘अंडर-व्होल्टेज’ समस्येवर काम सुरू केलं, तेव्हा त्यानं ८५०० वेळा होणारे तांत्रिक बिघाड थेट ५०० च्या खाली आणले. याचा परिणाम काय झाला? काही वर्षांनंतर शशांक पुन्हा त्याच भागात गेला असताना त्याला समजलं की, त्या परिसरात व्होल्टेज रेग्युलेटर्सचं दुकानच बंद झालंय! कारण आता ग्रीडमधून येणारी वीज इतकी स्थिर होती की, त्या महागाड्या रेग्युलेटरची गरजच उरली नव्हती. एका इंजिनिअर मित्रानं शोधलेल्या ‘सोल्युशन’मुळे सामान्य माणसाचे हजारो रुपये वाचले, हीच त्याच्यासाठी खरी मोठी पावती होती. Commander of the Lightning Empire

शशांकचं वेगळेपण असं की, तो केवळ एसी केबिनमध्ये बसून राहणारा अधिकारी नाही. गिरवलीत असल्यापासूनच त्याला लोकांमध्ये मिसळून संवाद साधण्याची आवड होती. अंबाजोगाईच्या शेतकरी संमेलनात शेतकऱ्यांना ‘घरात वीज कशी येते?’ हे साध्या भाषेत समजावून सांगण्यापासून ते थेट शेताच्या बांधावर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्यापर्यंत त्याचा हा प्रवास राहिला आहे.

शशांकने गिरवलीत असताना केवळ ‘फिल्डवर’ काम केलं नाही, तर तिथं त्यानं जमिनीवरची आव्हानं जवळून अनुभवली. गिरवलीत तो ‘टेस्टिंग’ला होता आणि तिथल्या अनुभवातूनच तो पुढे प्रमोट झाला. पण जेव्हा तो मॅनेजमेंट लेव्हलला गेला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, केवळ काम करून भागणार नाही; तर आपल्या इंजिनिअर्सना सक्षम करण्यासाठी त्यांना खास प्रशिक्षणाची (Training) गरज आहे.

‘ट्रेनिंग सेंटर’: शशांकचं ब्रेन चाईल्ड
आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जे ट्रेनिंग सेंटर उभं आहे, ती मूळ संकल्पना शशांकचीच! त्या काळी एचआर विभागाच्या इंचार्ज असलेल्या पुरोहित मॅडम आणि शशांक यांचे विचार जुळले. आपल्या इंजिनिअर्सना आधुनिक तांत्रिक ज्ञानाने सक्षम केलं पाहिजे, यावर दोघांचं एकमत झालं. शशांकने केवळ ही कल्पना मांडली नाही, तर हेड ऑफिसमध्ये प्रभावी प्रेझेंटेशन देऊन मॅनेजमेंटला कन्व्हिन्स केलं. मॅनेजमेंटनेही त्याच्यावर विश्वास दाखवला आणि या केंद्राची सर्व सूत्रं शशांकच्या हातात सोपवली.

ट्रेनिंग सेंटर सुरू झाल्यावर शशांकने आपल्या जुन्या सहकाऱ्यांनाही त्यात सामावून घेतलं. तो स्वतः तर उत्तम लेक्चर्स द्यायचाच, पण इतरांकडूनही प्रॅक्टिकल आणि लेक्चर्स करून घ्यायचा. ‘डिस्टन्स प्रोटेक्शन’ हा त्याचा सर्वात आवडीचा आणि हातखंडा असलेला विषय. आजही या विषयावर इतकं अभ्यासपूर्ण आणि सखोल लेक्चर देणारा दुसरा तज्ज्ञ शोधून सापडणार नाही. Commander of the Lightning Empire

शशांकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याला एमएसईटीसीएलच्या (MSETCL) संपूर्ण नेटवर्कची खडान् खडा माहिती आहे. कुठे काय अडचण आहे, कोणत्या भागात काय तांत्रिक प्रश्न आहेत, याची त्याला जाणीव आहे. तो ज्या ज्या क्षेत्रात गेला, तिथलं ज्ञान त्याने केवळ आत्मसातच केलं नाही, तर त्याचा उपयोग यंत्रणा सुधारण्यासाठी केला.

शेतकऱ्यांच्या आयुष्यातील नवी पहाट
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ‘वीज’ हा नेहमीच संघर्षाचा विषय राहिलाय. रात्रीच्या अंधारात साप-विंचवाचा धाक बाळगत शेताला पाणी द्यायला जाणं, हे पिढ्यानपिढ्यांचं दुःख! पण आज महाराष्ट्रातल्या ७५ ते ८० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं शक्य झालंय. या मोठ्या बदलाच्या मागे जो ‘कोअर तांत्रिक गट’ होता, त्याचा अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणजे आपला शशांक. शशांक नेहमीच म्हणतो, “एकटा माणूस काहीच करू शकत नाही, हे टीमचं यश आहे.” पण त्या टीमला योग्य दिशा देणारा तोच होता. रात्रीच्या जाचातून ७५ लाख शेतकऱ्यांची सुटका एकेकाळी अशक्य वाटणारी गोष्ट शशांकने वास्तवात आणली. महाराष्ट्रातल्या सुमारे ७५-८० लाख शेतकऱ्यांना आता रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची गरज उरलेली नाही. ‘बॅकएंड’ला त्यानं केलेल्या तांत्रिक नियोजनामुळेच आज शेतकऱ्याला हक्काची आणि स्थिर वीज दिवसा मिळू लागली आहे.

महाराष्ट्राच्या वीज क्रांतीचा ‘आर्किटेक्ट’
शशांक हे नाव आता केवळ एका मोठ्या अधिकाऱ्याचं उरलेलं नाही, तर ते एका अशा विचारवंताचं नाव झालंय ज्यानं भविष्यातले धोके ओळखून आजची धोरणं आखली आहेत. आपण घरातलं बटण दाबलं की लगेच दिवा लागतो. पण हा दिवा लागण्यासाठी त्याच सेकंदाला कुठल्यातरी लांबच्या वीज केंद्रात वीज तयार व्हावी लागते, हे आपल्याला ठाऊक नसतं. या अवाढव्य कामाचं नियोजन करणारा जो ‘मेंदू’ असतो, त्याला तांत्रिक भाषेत ‘लोड डिस्पॅच’ म्हणतात आणि महाराष्ट्रात या महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख म्हणून आपला शशांक काम पाहत आहे. Commander of the Lightning Empire

ग्रीड: एक ‘अदृश्य’ महाकाय मशीन
कल्पना करा, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत पसरलेले सर्व वीज जनरेटर्स एका अदृश्य दोरीने एकमेकांना बांधलेले आहेत. हे सगळे जनरेटर्स एकाच तालात आणि एकाच फ्रिक्वेन्सीने (५० हर्ट्झ) फिरत असतात. जेव्हा आपण घरातलं साधं बटण ऑन करतो, तेव्हा आपण हजारो किलोमीटर लांब असलेल्या त्या जनरेटरला एक छोटासा ‘धक्का’ (Micro Shock) देत असतो. हे भारतभर पसरलेलं जाळं म्हणजे प्रत्यक्षात एकच महाकाय ‘अदृश्य मशीन’ आहे.

शशांकने गिरवलीत असताना ‘प्रोटेक्शन’वर काम केलं होतं. म्हणजे जेव्हा एखादी वायर तुटते किंवा ट्रान्सफॉर्मर बिघडतो, तेव्हा यंत्रणेचं संरक्षण कसं करायचं, हे तो पाहायचा. पण आजचं ‘लोड डिस्पॅच’चं काम त्याहून कितीतरी पट मोठं आहे. आता केवळ बिघाड दुरुस्त करणं पुरेसं नाही, तर तो धक्का ग्रीडला बसण्याआधीच त्याचं नियोजन करून ग्रीड कोसळण्यापासून वाचवणं, हे त्याच्यासमोरचं खरं आव्हान असतं.

आपल्याला नवल वाटेल, पण महाराष्ट्राची वीज यंत्रणा युरोपमधल्या अनेक देशांपेक्षा मोठी आहे. भारताची ग्रीड सुमारे २४० गिगावॅटची आहे, त्यापैकी एकटा महाराष्ट्र ३१ गिगावॅटची ग्रीड सांभाळतो. शशांक नेहमी त्याच्या टीमला अभिमानानं सांगतो, “स्वतःला कमी समजू नका, आपण ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमधील अनेक विकसित देशांपेक्षा मोठी ग्रीड यशस्वीपणे चालवत आहोत.”

आपल्यासाठी एक मिनिट खूप छोटा असतो, पण विजेच्या जगात १०० मिलिसेकंदात (सेकंदाचा दहावा भाग) होत्याचं नव्हतं होऊ शकतं. एखादी मोठी वीज वाहिनी बंद पडली, तर तो ग्रीडसाठी खूप मोठा धक्का असतो. अशा वेळी शशांक आणि त्याची टीम कोणतीही चूक न करता, प्रगत सॉफ्टवेअर आणि बुद्धीच्या जोरावर हे संतुलन राखण्याची पराकाष्ठा करतात.

शशांक नेमकं काय करतो? १. अचूक अंदाज: उद्या महाराष्ट्राला दर १५ मिनिटांनी किती विजेची गरज पडेल, याचा अंदाज शशांकची टीम आधीच वर्तवते. २. समन्वय: वीज तयार करणाऱ्या केंद्रांना तो आदेश देतो की, “आता इतकीच वीज तयार करा.” ३. समतोल राखणे: वीज साठवून ठेवता येत नाही, त्यामुळे जेवढी मागणी, तेवढाच पुरवठा! हा समतोल राखण्याचं कठीण काम शशांक २४ तास करत असतो. हा समतोल थोडा जरी बिघडला, तर संपूर्ण राज्याची वीज व्यवस्था कोलमडू शकते.

हे काम आता जुन्या पद्धतीचं राहिलं नसून पूर्णपणे सॉफ्टवेअर आणि आयटीवर आधारित झालं आहे. मुंबई (कळवा) आणि कोल्हापूर इथल्या हाय-टेक कंट्रोल रूम्समधून शशांक सुमारे १५० तज्ज्ञांच्या मदतीने पूर्ण राज्यावर लक्ष ठेवतो. यात कुठेही प्रत्यक्ष नट-बोल्ट फिट करण्याचं काम नसतं, तर हे पूर्णपणे ‘बुद्धीचं काम’ (Brain Function) आहे. शशांकला फक्त महाराष्ट्रच नाही, तर दिल्लीतील नॅशनल लोड डिस्पॅच सेंटर आणि इतर राज्यांशीही सतत बोलावं लागतं, कारण संपूर्ण भारताची वीज यंत्रणा एकमेकांशी जोडलेली आहे. Commander of the Lightning Empire

जेव्हा शहरं काळोखात बुडतात…
२०१२ सालचा तो दिवस आठवतोय? जेव्हा अर्धा भारत अचानक काळोखात बुडाला होता. किंवा २०२० मध्ये झालेला मुंबईचा चक्काजाम. आपण सहज म्हणतो ‘लाईट गेली’, पण तांत्रिक भाषेत याला ‘ग्रीड फेल्युअर’ म्हणतात. अशा वेळी संपूर्ण राज्याला पुन्हा प्रकाशात आणण्याची आणि अशा संकटांना रोखण्याची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर असते, तो योद्धा म्हणजे आपला शशांक.

विजेचं जाळं (Grid) हे एखाद्या कोळ्याच्या जाळ्यासारखं असतं. जर एका ठिकाणचा धागा तुटला आणि तो वेळेत सावरला नाही, तर एकामागून एक सर्व धागे तुटत जातात. यालाच ‘कॅस्केड इफेक्ट’ म्हणतात. अशा आणीबाणीच्या वेळी मिनिटा-मिनिटाला फ्रिक्वेन्सीवर लक्ष ठेवणं आणि ती स्थिर ठेवणं हे अत्यंत जिकिरीचं काम शशांकला करावं लागतं.

लोड डिस्पॅच हे वीज क्षेत्रातील एक ‘गुप्त’ (Hidden) केंद्र आहे. अगदी वीज मंडळातल्या अनेकांनाही यातील गुंतागुंत माहीत नसते. शशांक केवळ वीज वाटप करत नाही, तर तो एका ‘इंजिनिअरिंग मॅनेजमेंट’चा धुरा सांभाळतोय: १. अपघातांचे विश्लेषण (Post-Mortem): ग्रीडमध्ये एखादी छोटी जरी घटना घडली, तरी शशांकची टीम त्याचं सखोल विश्लेषण करते. ‘हे का झालं?’ आणि ‘पुन्हा होऊ नये म्हणून काय करावं?’ याचे अचूक रिपोर्ट तो तयार करतो. २. धोक्याची पूर्वसूचना: भविष्यात ग्रीडमध्ये काय धोके येऊ शकतात, याचा अंदाज घेऊन कोणती खबरदारी घ्यायची, याचे महत्त्वाचे इनपुट्स शशांककडूनच दिले जातात. ३. समन्वयाची कसरत: आज वीज क्षेत्रात अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्या आहेत. या सर्वांमध्ये मेळ घालून नियमांच्या चौकटीत काम करून घेणं ही शशांकसाठी एक मोठी कसरत असते.

करोडो लोकांच्या घरापर्यंत वीज पोहोचवणारी यंत्रणा अवाढव्य आहे, पण ती नियंत्रित करणारा हा गट मात्र खूप लहान आहे. केवळ १५० ते २०० तज्ज्ञांच्या मदतीने शशांक पूर्ण महाराष्ट्राच्या ऊर्जेचं संतुलन राखतो. हे काम नट-बोल्ट फिरवण्याचं नसून अहोरात्र बुद्धीचा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केलेलं ‘डेटा ॲनालिसिस’ आहे.

शशांक मुळात ट्रान्समिशन क्षेत्रातील अनुभवी अधिकारी. पण जेव्हा ‘लोड डिस्पॅच’च्या कार्यकारी संचालक पदाची संधी आली, तेव्हा त्याने हे आव्हान स्वीकारलं. सुरुवातीला कदाचित त्याला यात फारसा रस नव्हता, पण या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याने आज या क्षेत्रावर आपली पकड मजबूत केली आहे. Commander of the Lightning Empire

भविष्यातील ऊर्जा क्रांतीचे सारथी
गेल्या १०० वर्षांत वीज क्षेत्रात जेवढे बदल झाले नाहीत, त्यापेक्षा जास्त बदल पुढच्या १० वर्षांत होणार आहेत आणि या बदलांच्या केंद्रस्थानी आपला शशांक आहे. आजची वीज यंत्रणा केवळ कोळसा जाळण्यापुरती उरली नसून, ती आता ‘इलेक्ट्रॉनिक्स’ आणि ‘वेदर सायन्स’ (हवामान शास्त्र) यांचा एक अद्भुत मिलाफ झाली आहे.

पूर्वीची ग्रीड कोळशावर चालणाऱ्या मोठ्या यंत्रांवर अवलंबून होती. पण आज शशांकसमोरचं आव्हान वेगळं आहे. सौर (Solar) आणि पवन (Wind) ऊर्जा ही स्थिर नसते. दुपारी सूर्य तळपला की सौर ऊर्जा ग्रीडमध्ये ओसंडून वाहते, अशा वेळी कोळशाचे प्लॅन्ट्स कमी करावे लागतात. पण कोळशाचा प्लॅन्ट काही घराच्या बटणासारखा लगेच चालू-बंद होत नाही. हे तासा-तासाचं आणि मिनिटा-मिनिटाचं संतुलन राखणं म्हणजे शशांकसाठी एक मोठी ‘तांत्रिक सर्कस’ असते.

शशांकच्या नियोजनामुळे आता पॉवर ग्रीड थेट हवामानाशी जोडली गेली आहे. आपल्या अंबाजोगाईत ऊन आहे का? पुण्यात ढग आहेत का? लातूरला वारा किती जोरात आहे? यावर आता महाराष्ट्राची वीज व्यवस्था अवलंबून असते. हे गुंतागुंतीचं गणित दर १५ मिनिटाला सोडवावं लागतं. केवळ रोजची कामं न करता शशांक भविष्याचा वेध घेतोय. त्याने आयआयटी,मुंबई सोबत एक मोठा करार केला असून, ५ प्रमुख क्षेत्रांत संशोधन सुरू केलं आहे. महाराष्ट्राला जागतिक बदलांसाठी तयार करणं हाच त्याचा मुख्य उद्देश आहे.

एकेकाळी जो विभाग दुय्यम मानला जायचा, त्या ‘लोड डिस्पॅच’ला शशांकने आपल्या कौशल्याने संपूर्ण सिस्टिमचा सर्वात महत्त्वाचा भाग बनवलं आहे. आज जगात ज्या ‘एनर्जी ट्रान्झिशन’ची चर्चा आहे, त्याचं यशस्वी प्रात्यक्षिक शशांक महाराष्ट्रात करून दाखवतोय.शशांक हा केवळ एक इंजिनिअर नाही, तर तो एक ‘व्हिजनरी’ आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि तांत्रिक मर्यादा यांचा अचूक मेळ घालून तो महाराष्ट्राचा उजेड कायम राखत आहे.

शशांकचा स्वभाव आणि त्याचा आजवरचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याच्या कामाच्या प्रवासात काही ‘हितशत्रू’ देखील निर्माण झाले, कारण त्याचे विचार आणि कामाची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. पण शशांकचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, तो कोणत्याही परिस्थितीत दबून राहत नाही. तो त्याचं मत नेहमी स्पष्टपणे मांडतो. अनेकदा मॅनेजमेंटला त्याचं म्हणणं पटत नाही आणि त्यामुळे त्याला ‘साईड ट्रॅक’ देखील केलं जातं, पण तो डगमगत नाही. तो कोणत्याही आमिषाला कधीच बळी पडत नाही. आज तो एवढ्या मोठ्या पदावर आहे, जिथे मॅनेजमेंट आणि राजकारणाचे अनेक दबाव असतात, पण तो त्या सर्वांतून अगदी सहज निभावून बाहेर पडतो.

शशांककडे भविष्याचा वेध घेण्याची जबरदस्त क्षमता आहे. पुढच्या ५ ते १० वर्षांत काय घडू शकतं, हे तो आजच ओळखतो; ही त्याला मिळालेली एक ‘दैवी देणगीच’ आहे. त्याची वक्तृत्व कला उत्तम आहे आणि वाचन दांडगं असल्यामुळे तो समोरच्या माणसावर आपली छाप लगेच पाडतो. त्याचं ज्ञान अफाट आहे त्याच्या याच गुणांमुळे आज केवळ कामाच्या ठिकाणीच नाही, तर अगदी वरच्या लेव्हलवर त्याचे अनेक मित्र आणि चाहते आहेत. Commander of the Lightning Empire

मुलांची प्रगती आणि कौटुंबिक आधार
शशांक यांच्या यशात त्यांच्या पत्नीचा वाटा मोलाचा आहे. “तिच्या जीवावर आमचं चाललंय,” असं तो मोठ्या अभिमानाने सांगतो. त्यांची मुलंही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जागतिक स्तरावर आपलं नाव कमावत आहेत: मोठा मुलगा मिहीर IIT मधून पदवीधर झाला. गणिताची आवड असल्याने करिअर स्विच करून आता अमेरिकेत ‘मॅथ्स’मध्ये एम.एस. (MS) करत आहे. धाकटा मुलगा रुद्र बिट्स पिलानी (BITS Pilani) मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअर होऊन सध्या बेंगलोरमध्ये कार्यरत आहे. Commander of the Lightning Empire

Tags: Commander of the Lightning EmpireGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share27SendTweet17
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.