भाजपने केली मदत, विलगीकरणासाठी सुरु होती पैशांची मागणी
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पिंपरमधील पंकज रहाटे या तरुणाला विमानतळावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी अडकवून ठेवले होते. ही बाब गुहागर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर मुंबईत संपर्क साधून पंकजला सोडविण्यात आले. शनिवारी (3 जुलै) रात्री तब्बल 16 तासांनंतर त्याला विलगीकरणासाठी एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
Pankaj Rahate was detained at the Mumbai Airport by Bombay Municipal Corporation (BMC) employees. When the BJP Workers in Guhagar taluka came to know about this matter, they contacted Pankaj in Mumbai and released him after 16 hours on Saturday (July 3) night. Now Pankaj has been kept in a hotel for segregation
कोण आहे पंकज
गुहागर तालुक्यातील पिंपर हे मुळ गाव असलेला पंकज रहाटे मुंबईत रहातो. मुंबईत हॉटेलमध्ये शेफ म्हणून तो नोकरीला होता. कोरोनाच्या काळात सर्वच क्षेत्रांना फटका बसला. तसाच फटका हॉटेल व्यवसायालाही बसला. कोरोना संकटामुळे पंकजची नोकरी गेली. उदरनिर्वाहासाठी पैसा पाहिजे, त्यासाठी नोकरी पाहिजे म्हणून गेले वर्षभर पंकज विविध ठिकाणी नोकरी करत होता. चांगली नोकरी शोधत होता. मार्च महिन्यात त्याला कतारमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये तीन महिने कालावधीची नोकरी मिळाली. येणारा प्रत्येक पैसा संसार चालविण्यासाठी आवश्यक असल्याने पंकजने ही नोकरी स्विकारली. 1 एप्रिल 2021 रोजी पंकज कतारला गेला. त्याचा नोकरीचा कालावधी संपला म्हणून शुक्रवारी (ता. 2 जुलै) पंकज मुंबईत परत आला.
काय झाले विमानतळावर
पंकज शुक्रवारी (ता. 2 जुलै) रात्री 2.30 वा. मुंबईच्या विमानतळावर आला. त्याच्याकडे कतारमधील शासकीय रुग्णालयाचा आरटीपीसीआर रिपोर्ट होता. तसेच एकदा झालेल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र होते. विमानतळावरील सर्व कायदेशीर प्रक्रिया संपवून तो बाहेर पडला तेव्हा महापालीकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवले. परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ७ दिवस विलगीकरणात रहावे लागते. त्यामुळे हॉटेलमध्ये रहाण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पंकजला 25 हजार रुपये भरण्यास सांगितले. पंकज सातत्याने पैसे नसल्याचे सांगत होता. मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी पंकजला विमानतळावरुन सोडले नाही. शनिवारी (ता. 3 जुलै) तेथील एका अधिकाऱ्याने पंकजकडे 12 हजार रुपये दिलेस तर तुला घरी सोडण्याची व्यवस्था करतो असे सांगितले. मात्र इतके पैसेही पंकजजवळ नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला तब्बल 16 तास विमानतळावरच बसवून ठेवले. याच कालावधीत पंकजने आपण विमानतळावर अडकलो आहोत अशी माहिती आपल्या मित्रांना, नातेवाईकांना दिली.
भाजपचा पाठपुरावा
शनिवारी (ता. 3 जुलै) सकाळी 10 च्या दरम्यान पंकज रहाटे हा गुहागर तालुक्यातील तरुण विमानतळावर अडकला आहे. अशी माहिती गुहागर तालुका भाजपचे सरचिटणीस सचिन ओक यांच्यापर्यंत पोचली. तातडीने ओक यांनी तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, उत्तर रत्नागिरी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांना ही माहिती दिली. त्यानंतर सुत्रे हलली. डॉ. नातूंनी ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांना ही माहिती दिली. संतोष जैतापकर यांनी पंकज रहाटेला नेमके का अडकवले आहे याची माहिती घेतली. विविध कार्यकर्त्यांद्वारे पंकजला धीर देण्यात आला. आम्ही तुला सोडवू, चिंता करु नको. असे निरोप रत्नागिरी, गुहागर, मुंबई येथून सतत पंकजला फोन करुन दिले जात होते. दरम्यान भाजप कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरुन पंकजने विमानतळावरुन आपली कैफियत मांडणारा व्हिडिओ तयार केला. सामाजिक माध्यमांमध्ये काम करणाऱ्या भाजप कार्यकर्ते मनोज डाफळे आणि गणेश पालकर यांनी हा व्हिडिओ मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांपर्यंत पोचवला. शिवाय मुंबईमध्ये हा व्हिडिओ पसरवला. त्यामुळे शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोकणातला तरुण विमानतळावर अडकल्याची गोष्ट मुंबईच्या कानाकोपऱ्यात पसरली.
याच कालावधीत खासदार कोटक यांनी विमानतळ व्यवस्थापनाशी तर नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनीमहानगरपालिकेकडे संपर्क साधला. सातत्याने दबाव वाढत होता. शनिवारी रात्रीपर्यंत उपाशी असलेल्या पंकजच्या भोजनाची व्यवस्था तेथील काही अधिकाऱ्यांनी केली. तोपर्यंत अन्य प्रक्रिया आटपून अखेर शनिवारी रात्री 10.30 वाजता भाजप कार्यकर्त्यांनी पंकज रहाटेला विमानतळावरुन सोडवले. भाजप कार्यकर्त्यांनी पंकजला अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये 7 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवले आहे. त्यासाठी केवळ रु. 3 हजार इतका खर्च आल्याचे पंकजने गुहागर न्यूजला सांगितले.
गुहागरमधील सचिन ओक व अन्य भाजप पदाधिकारी, पिंपरचे ग्रामस्थ, मुंबईतील खासदार कोटक, नगरसेविका मोडक, कार्यकर्ते आदींनी फोन करुन मला धीर दिला. भाजपमुळे माझी विमानतळावरुन सुटका झाली. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
पंकज रहाटे, पिंपर