काळा कस्तूर ( Indian blackbird ) Scientific Name : Turdus Simillimus
या पक्षाला काळा कस्तुर किंवा ज्याला कस्तुरी , गायकवाड , सालई ,सफेद साळुंखी ,साल भोरडा ,अशा अनेक नावांनी ओळखले जाते. या पक्षाकडे पाहिल्यावर सर्वांना वाटेल ही हा कावळा आहे. पण थोडं निरिक्षण करा. या पक्षाच्या डोळ्याजवळ पिवळट रंगाचे वर्तुळ असते. पायांचा रंगही करडा असतो. चोच पिवळट तांबुस असते. हा पक्षी मध्यम आकाराचा असून मैने एवढा असतो. मादीचा कंठ काळ्या रेषा असलेला पिवळट तपकिरी वर्णाचा असतो आणि चोच काळी असते. हा पक्षी फक्त भारत आणि श्रीलंकेत आढळतो. भारतात दक्षिण राजस्थान, पुर्व गुजरात पुर्वेकडे पश्चिम विंध्य रांगा व सातपुडा ते शिवनीपर्यत, केरळमधील संलग्न डोंगराच्या रांगा व तामिळनाडु या भागात ते हिवाळी पाहुणे म्हणून स्थलांतर करतात. कोकणात एप्रिल महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत हा पक्षी सर्वाधिक प्रमाणात आढळतो. जुन ते ऑगस्ट हा त्यांचा विणीचा ( प्रजननाचा ) काळ असतो . हे पक्षी पानगळीची जंगले व सदाहरित पर्णी वनामध्ये राहतात.