@Makarand Gadgil
टिटवी ( Redwattled Lapwing )
Scientific Name – Vanellus Indicus
टिटवी किंवा लाल गाठीची टिटवी , ताम्रमुखी किंवा रक्तमुखी टिटवी
कोकणात टिटवी माहिती नाही असा माणुस सापडणं कठिण. टिटवा -टिटवी हे शब्द ज्ञानेश्वरीत दोनदा आले आहेत . संत एकनाथ यांनी टिटवी नावाचे भारूड लिहीले आहे. या टिटवीबद्दल अनेक कथा प्रत्येक घरात सांगितल्या जातात. खरतरं कोणताच प्राणि, पक्षी अपशकुनी नसतो. पण तरीही मनुष्य काही पक्षी, प्राणी यांना बदनाम करतात. तशाचप्रकारे अपशकुनी म्हणून बदनाम झालेली ही टिटवी.
भारतात टिटवीच्या दोन प्रजाती सर्रास आढळतात.
1) रक्तमुखी टिटवी
2) पीतमुखी टिटवी.
रक्तमुखी टिटवी भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, मलाया आणि सुमात्रात ही आढळते. हिमालयात ही १,८३० मी. उंचीपर्यंत सापडते. लागवडीखालच्या शेतात, कुरणात व तलाव, नद्या यांच्या आसपास ही राहते. दाट अरण्य किंवा रेताड प्रदेशात मात्र ही नसते.
हीच्या पायाच्या विशिष्ठ रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती जमिनीवर तुरुतुरु चालते. जमीन ऊकरून ‘ टिट् – टिटिट् – ट्यूटिट् ‘ असा आवाज काढून उडाताना संकटाचा थोडा जरी संशय आला तरी ती इतरांना सावध करते.
टिटवी हा पक्षी सुमारे ३३ सेंमी लांबीचा असून त्याची चोच लाल डोके गळा छाती काळ्या रंगाची व त्याखाली पोटाकडे पांढरा रंग तर पाठीपासून पंखापर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा व पाय लांबट, काळसर पिवळ्या रंगाचे असतात . याची मुख्य ओळख म्हणजे दोन्ही डोळ्यां जवळ लाल रंगाचे कल्ले असतात.
नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी फळे तसेच किडे, कीटक खातात. यांची घरटी झाडामधे असतात.
विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्ट असतो. उघड्या जमिनीवर पायाने थोडीशी जागा उकरून मादी तेथे चार अंडी घालते. अंडी कारड्या तपकिरी रंगाची असून त्यांवर काळसर ठिपके असतात. अंड्यांचा रंग भोवतालच्या परिस्थितीशी इतका एकरूप असतो की, ती सहसा दिसत नाहीत.
जगभरात टिटवीच्या दोन प्रजाती आणि २५ जाती आहेत. बहुधा पाणवठ्याच्या जागी हा पक्षी जोडीने दिसतो. प्रजननाच्या हंगामाखेरीज ते मोठ्या कळपाने आढळतात.
आसाम वगळता भारतात सर्वत्र आढळणारी टिटवीची दुसरी जाती म्हणजे व्हॅनेलस मलबारिकस. या पक्ष्याला पीतमुखी टिटवी म्हणतात. हा पक्षी रक्तमुखी टिटवीपेक्षा किंचित लहान असतो. डोळ्यांसमोर पिवळ्या गलुली व काळे टोक असलेली पिवळी चोच ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.