@Makarand Gadgil
Coppersmith Barbet
Scientific name: Megalaima haemacephala
हा पक्षी भांडी ठोकणाऱ्या तांबट या कारागिराने काढलेल्या आवाजासारखा टँक, टँक, असा ओरडतो. म्हणून त्याला तांबट म्हणतात.
तांबट हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. भारतासह श्रीलंका, मलेशिया, फिलिपीन्स या देशातही या दिसतो. याला हिंदीत ‘छोटा बसंत ‘असे म्हणतात.
हा शेवाळी रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. तांबटच्या पाठीवरील पंखांचा रंग शेवाळी हिरवा असतो. पोटाच्या बाजूला पिवळसर सफेद रंगावर राखाडी किंवा गडद तपकिरी रंगाचे फराटे असतात. डोळे काळे असून डोळ्यांभोवती पिवळी वर्तुळे असतात. डोक्यावर पुढच्या भागावर आणि गळ्याला भडक तांबडी पिसे असतात. त्यामुळे तो डोक्याला आणि गळ्याला गंध लावल्यासारखा दिसतो. डोक्याच्या मागच्या भागापासून निघून गालांमागून खाली गळ्यापर्यंत आणि पुढे चोचीपर्यंत पसरलेले काळे भाग असतात. डोळ्याच्या वर आणि खाली भुवयांप्रमाणे पिवळे पट्टे असतात. खालचे पिवळे पट्टे अधिक रुंद असतात. डोळे व भुवया यांच्यामधून जाणारी एक अरुंद काळी पट्टी चोचीपासून मागच्या काळ्या रंगापर्यंत गेलेली असते. चोच जाड व काळी असते. चोचीच्या बुडाशी धाग्यांसारखी काळी पिसे असतात. ही पिसे दाढीसारखी दिसतात, म्हणून फ्रेंच भाषेत बारबेट म्हणजे दाढीवाला म्हणतात. पाय लालसर असून नखर काळे असतात. शेपूट तोकडी असते. पक्ष्याच्या नर-मादीत फारसा फरक नसतो. तांबट पक्ष्याचे पिल्लु हे हिरव्या रंगाचे असते, परंतु त्याच्या डोक्यावर व छातीवर लाल रंग असतो.
तांबट पक्षी वृक्षवासी असून जमिनीवर क्वचितच उतरतो. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात हा झाडाच्या शेंड्यावर बसलेला दिसून येतो. त्याच्या हिरव्या रंगामुळे तो सहसा दिसून येत नाही.
हा येथील कायमचा रहिवाशी आहे. मृत झाडांवर वा झाडांच्या मृत खोडांवर हे पक्षी पोकळी तयार करून राहतात. अशा खोडाची निवड करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या खोडावर लाकूड पोखरणे त्यांना सोपे जाते. तांबट पक्षी या पोकळीचे घरटे म्हणून वापर करतो. वड, पिंपळ, अंजीर, जांभूळ अशा झाडांवर हा पक्षी आढळून येतो.
या पक्ष्यांच्या आहारात प्रामुख्याने फळांचा समावेश होतो. त्याला रसयुक्त फळे आवडतात. तसेच ठराविक फुलांच्या पाकळ्या ही खातो . प्रथिनांची गरज भागवण्यासाठी तांबट पक्षी ठरावीक कीटकही खातो .
फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत तांबट पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो. तांबट पक्ष्याची जोडी आपले घरटे एका ठरावीक उंचीवरील आडव्या फांदीवर करते असे आढळून येते. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी आळीपाळीने करतात .
गुहागर न्यूजच्या स्पर्धेविषयी माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
चला लुटूया सुट्टीचा आनंद, स्पर्धेला नाही गुणांचा गंध, मनी हवा नवकल्पनांचा छंद