पक्षी निरीक्षण : 4 @Makarand Gadgil


लाल बुडाचा बुलबुल ( Red vented bulbul )
Scientific Name = Pycnonotus cafer
साधारण २० से.मी आकाराच्या असणारा या बुलबुलाचा मुख्य रंग भुरकट तपकिरी असून त्याच्या डोक्याचा रंग काळा असतो व त्यावर एक लहान शेंडी असते. त्याच्या पाठीवर आणि छातीवर तुटक रेषांसारख्या खुणा असतात . तर पाठीचा मागील भाग पांढरा असतो. उडताना तो स्पष्ट दिसतो. त्याची मुख्य ओळख म्हणजे त्याचा पार्श्वभाग लाल असतो. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.


लाल बुडाचा बुलबुल हा संपूर्ण भारतासह बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार येथील उष्णकटिबंधीय वनात, झुडपी जंगलात ,शेतीच्या प्रदेशात किंवा बागेत जोडीने अथवा लहान थव्यात राहणारा पक्षी आहे. त्याच्या आकारावरून रंगावरून किमान सात उपजाती आहेत. फळे, कीटक, दाणे, मध हे त्याचे मुख्य खाद्य आहे.
फेब्रुवारी ते मे हा कालावधी या बुलबुलाचा विणीचा काळ असतो. त्याचे घरटे जमिनीपासून पाच ते दहा मीटर उंच झाडावर गवताचे असून ते खोलगट असते. मादी एकावेळी दोन ते तीन फिकट गुलाबी रंगाची व त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. पिल्लांचे संगोपन जोडीने केले जाते.

