टकाचोर_ Rufous tree pie Scientific name = Dendrocitta vagabunda
भारतासह पाकिस्तान, म्यानमार, थायलंड, कंम्बोडिया, लाओस या देशांमध्ये टकाचोर आढळतो. टकाचोर कावळ्या पेक्षा आकाराने थोडासा लहान आणि सडपातळ पक्षी आहे .नर आणि मादी बर्यापैकी सारखेच दिसतात . डोक्याचा आणि मानेचा रंग पूर्ण काळा तर मानेपासून खाली मंद तपकिरी आणि पुन्हा शेपटी निळसर करड्या रंगाची असते . चोचीचा रंग काळा असून टोकाला ती गळासारखी अर्धवक्राकार असते. समोरच्या बाजूने पाहिल्यास शेपटीवर काळा आणि निळसर करड्या रंगाचे प्रत्येकी दोन पट्टे दिसतात . या हटके रंगसंगतीमुळे टकाचोर अगदी उठून दिसतो . सौंदर्यामध्ये आणखी एक भर पडते ती शेपटीच्या लांबी मुळे ! टकाचोराची शेपटी ही शरीरापेक्षा दीडपट लांब असते. टकाचोर हा शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे अन्न खातो . झाडावर लागलेली फुले ,फळे हे त्याचे मुख्य अन्न .तसेच सरपटणारे प्राणी व पक्ष्यांची अंडी ,मधमाशा इत्यादी खाणे पसंत करतो. गंमतीची बाब म्हणजे कावळ्याप्रमाणे यांच्यामध्ये देखील अन्न जमा करून लपवून ठेवायची सवय आहे . टकाचोर हा बहुदा पानगळीच्या किंवा हरित वनांमध्ये राहणे पसंत करतो .उंच झाडांवर खोडामध्ये काड्यांच्या सहाय्याने तो आपले घरटे बनवतो . घरटी काहीशी उथळ असतात . विणी चा हंगाम हा एप्रिल ते जून महिन्यात असतो . प्रत्येक घरट्यात साधारणपणे तीन ते पाच अंडी घातली जातात. सुपारी आणि इतर इतर पिकांवरील किडी खात असल्याने टकाचोर हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो .