दि. 5 नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई सभागृह शेरे नाका येथे पुरस्काराचे वितरण
रत्नागिरी, ता. 28 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे या वर्षी चार विशेष पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये लहान वयात कांची मठाची तेनाली महापरीक्षा उत्तीर्ण झालेला प्रियव्रत पाटील, जिल्ह्यातील पहिले आयर्नमॅनचा किताब पटकावणारे डॉ. तेजानंद गणपत्ये आणि संगीत नाट्य स्पर्धेत तबलावादनात प्रथम विजेते प्रथमेश शहाणे यांचा समावेश आहे. तसेच दहा वर्षे कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या कीर्तनसंध्या परिवाराचा सन्मान केला जाणार आहे. अध्यक्ष अवधूत जोशी व सहकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी दिली. जास्तीत जास्त संस्कृतप्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ब्राह्मण संघातर्फे करण्यात आले आहे. Awarded by Karhade Brahmin Sangh


या पुरस्काराचे वितरण येत्या ५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या शेरे नाका येथील राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिवण, गोवा येथील श्रीविद्या पाठशाळेचे ब्रह्मर्षि महामहोपाध्याय डॉ. देवदत्त पाटील विदुषी डॉ. सौ. अपर्णा देवदत्त पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. डॉ. देवदत्त पाटील यांनी आतापर्यंत संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले आहे. रिवण येथे पाठशाळेत त्यांच्याकडे ३० विद्यार्थी -विद्यार्थिनी शिकत आहेत. लालबहाद्दूर शास्त्री विद्यापीठात सर्वांत लहान वयात महामहोपाध्याय पदवी मिळवणारे डॉ. पाटील हे विद्वान आहेत. त्यांना बादरायण व्यास सन्मान, स्वर्णाङगिलीयक शृंगेरी जगद्गुरु महास्वामी सन्मान, पीठारोहण स्वर्णमहोत्सव पुरस्कार आदी पुरस्कार सन्मान मिळाले आहेत. त्यांनी पुण्यात १६ वर्षे श्री नृसिंहसरस्वती पाठशाळेत अध्यापन केले. त्यांच्या १० विद्यार्थ्यांनी शृंगेरी पीठ येथे कांची वेदवेदांतशास्त्र सभेत महापरीक्षा दिली असून २ विद्यार्थ्यांनी समग्र शास्त्रांचा अभ्यास केला आहे. पुण्यात त्यांनी श्रीसुब्रहमण्य आर्ष विद्या परिषदेची स्थापना केली. मासिक सभांसह महासभांचे आयोजन ते करतात. Awarded by Karhade Brahmin Sangh


प्रमुख पाहुण्या डॉ. अपर्णा पाटील या न्यायशास्त्राच्या अभ्यासक आहेत. गीता व बालशिक्षण, गीता दैनंदिन जीवनासाठी, शास्त्रपरिचय आणि विस्तार, शास्त्र काय सांगते या विषयावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. त्यांनी वेदातील देवीसुक्त, पातंजल योगशास्त्र आणि भगवद्गगीतेतील सहावा अध्याय आदींवर त्यांनी शोधनिबंध सादर केले आहेत. श्री सुब्रह्मण्य वाङ्मयीन परिषदेच्या त्या सचिव असून गुरुकलमध्ये अध्यापन करत आहेत. Awarded by Karhade Brahmin Sangh
डॉ. तेजानंद अनिल गणपत्ये यांनी कझाकिस्तानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत आयर्नमॅन बनण्याचा मान मिळवला. ते रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले आयर्नमॅन ठरले. अत्यंत खडतर समजली जाणारी स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण केली. ते एमबीबीएस, एमडी (पॅथॉलॉजी) असून चिपळूणमध्ये पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालवतात. गेल्या तीन वर्षांपासून ते रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंगची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी या खेळांमधील अनेक स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. डॉ. गणपत्ये यांनी कर्करोगावर मात करून सलग २ वर्षे कठोर प्रयत्न केले आणि फुल आयर्नमॅन बनले. डॉ. गणपत्ये यांनी पोहणे 3.8 किमी (१ तास ४५ मि.), सायकलिंग १८० किमी (७ तास ४४ मि.) आणि धावणे 42.2 किमी (५ तास २९ मि.) हे तीनही क्रीडा प्रकार १५ तास १७ मिनीटांत पूर्ण केले व आयर्नमॅन बनले. त्यांचा सन्मान कऱ्हाडे ब्राह्मण संघ करणार आहे. Awarded by Karhade Brahmin Sangh


प्रियव्रत पाटील त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी न्यायशास्त्राचा अभ्यास केला. तेव्हा ते श्रीमद्भगवद्गीतेची स्मरण परीक्षा शृंगेरी श्रीचरणी उत्तीर्ण झाले. तेनाली महापरीक्षेच्या निमित्ताने त्यांनी सिद्धांतकौमुदी, परिभाषेन्दुशेखर असे महान ग्रंथ अभ्यासले. सर्वांत कठीण समजली जाणारी तेनाली महापरीक्षा कमी वयात म्हणजे १६ व्या वर्षी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये शृंगेरी श्री चरणासमोर व्याकरणाची महापरीक्षा घेण्यात आली. तेथे त्यांना शास्त्रात सांगितलेल्या प्रयत्नांनुसार सर्वोत्तम दर्जा दिला व त्यांना व्याकरण अलंकार ही पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी न्यायरत्न पदवी प्राप्त श्री श्री विजया विठ्ठल चंदन यांच्याकडे मुक्तावली ते सिद्धांत लक्षणांपर्यंत ज्ञानशास्त्राचा अभ्यास केला. राष्ट्रीय संस्कृत संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत व्याकरण भाषणात रौप्य पदक आणि वेदभाष्य भाषणात सुवर्णपदक जिंकले आहेत. संस्कृतमधील या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना गौरवण्यात येणार आहे. Awarded by Karhade Brahmin Sangh


प्रथमेश शहाणे हे तबलाविशारद असून संगीत राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी वडिल रविकांत शहाणे व चंद्रकांत देसाई, हेरंब जोगळेकर, गोवा कला अकादमीचे शैलेश गावकर यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण घेतले आहे. २०२०, २०२२ च्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी तबलावादनात द्वितीय क्रमांक व यंदा मंदारमाला नाटकासाठी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी आतापर्यंत दिग्गज कलाकारांना साथसंगत केली असून संगीत नाटकांतून भूमिकाही केल्या आहेत. Awarded by Karhade Brahmin Sangh
कीर्तनसंध्याचा सत्कार
रत्नागिरीतील अवधूत जोशी व सहकाऱ्यांनी २०१२ मध्ये कीर्तनसंध्या परिवाराची स्थापना केली. त्यामार्फत दरवर्षी हिंदुत्वाचा अंगार फुलवणारी कीर्तने आयोजित केली. यात राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे यांची हिंदुत्व व राष्ट्रभक्तीवरील कीर्तने सादर झाल्यामुळे रत्नागिरीत कीर्तनप्रेमींची संख्या वाढली. उमेश आंबर्डेकर, नितीन नाफड, गुरु जोशी, मोरेश्वर जोशी, योगेश हळबे, योगेश गानू, मिलिंद सरदेसाई, मकरंद करंदीकर, गौरांग आगाशे, महेंद्र दांडेकर, अभिजित भट, रत्नाकर जोशी यांनी कीर्तनसंध्या परिवारात योगदान दिले आहे. Awarded by Karhade Brahmin Sangh