सीमाशुल्क विभागाने पकडला ३ लाखाचा गांजा
गुहागर, ता. 19 : आरेगांव मध्ये थरारक धाडीपासून सुरु झालेले अखेर जावली सातारा येथे जावून थांबले. सीमाशुल्क विभागाच्या टिमने सातारा जिल्ह्यात धाड टाकून सुमारे 3 लाख रुपये किंमतीचा 23.631 किलो गांजा जप्त केला आहे. ( Aregaon Raid mystery was solved) सदर धाडीमध्ये संतोष पार्टे, रा. केलघर (मेढा), ता. जावली, जिल्हा सातारा या व्यक्तीला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. जावळीच्या न्यायालयाने संतोष पार्टे याला 31 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
गेले महिनाभर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सीमा शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी (CUSTOM) अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) काम करत आहेत. याच कारवाईअंतर्गत गुहागर शहरानजिकच्या आरेगावातील एका घरात आठवडाभरापूर्वी रात्री सीमाशुल्क विभागाच्या टिमने धाड टाकली होती. या धाडीची माहिती कोणालाच नसल्याने दुसऱ्या दिवशी गुहागरमध्ये अफवांना उत आला होता. यासंदर्भात सीमाशुल्क तपासी अंमलदार मुकेश कुमार यांनी अत्यंत त्रोटक प्रतिक्रिया दिली होती. तसेच मोठ्या कारवाईचे संकेतही दिले होते. त्याप्रमाणे पुणे सीमा शुल्क आयुक्तालायाच्या अख्यत्यारीखाली दापोली कस्टम विभागाने 17 मार्चला थेट केलघर (मेढा), ता. जावळी येथे जावून कारवाई केली. या कारवाईत संतोष पांडुरंग पार्टे यांच्या फार्म हाऊसवर धाड (Raid) टाकण्यात आली. त्यावेळी सुमारे 3 लाख रुपये किंमती 23.631 किलो गांजा सीमा शुल्क विभागाने जप्त केला. संतोष पार्टेला अटक केली. (Custom Department Raid in Javali, Dist. Satara. They arrested Santosh Parte with 23.631 Kg GANJA)
याबाबत मुकेश कुमार म्हणाले की, अंमली पदार्थ तस्करीमध्ये मुळ गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी सावधतेने माहिती जमवावी लागते. आरेगावमधील कारवाई त्याचाच भाग होता. अशी धाड टाकण्यापूर्वी संबधितांची पूर्ण माहिती काढली जाते. प्रत्येक कारवाईत अंमली पदार्थ मिळालाच पाहिजे असा आग्रह नसतो. चौकशीतून समोर येणाऱ्या अनेक बाबींवरुन मोठ्या कारवाईची दिशा निश्चित होते. 17 मार्चला सायंकाळी झालेल्या कारवाईची तयारी महिनाभर सुरु होती.
Related News : शनिवारी रात्री आरेगावात घडले थरार नाट्य