गुहागर, ता. 22 : तालुक्यातील खोडदे गावातील होतकरू विद्यार्थी अनुज संदेश साळवी याची सिंगापूर येथे होणाऱ्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, राजापूर, रत्नागिरी येथील आणि सद्यस्थितीत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे शिक्षण घेत असलेल्या अनुजची स्वान (SWAN) फाउंडेशन, पुणे यांच्या मार्फत राज्यस्तरीय परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवत निवड झाली आहे. या निवडीमुळे अनुजला दि. 26 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत सिंगापूर येथील विविध शैक्षणिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. Anuj Salvi Selected for Study Tour
या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना सिंगापूरमधील आधुनिक तंत्रज्ञान, शैक्षणिक संस्था, विज्ञान संग्रहालये तसेच जागतिक दर्जाच्या विकासकामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. अनुजसाठी हा दुसरा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौरा असून त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा अनुभव अत्यंत मोलाचा ठरणार आहे. अनुजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावातील नागरिक, शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Anuj Salvi Selected for Study Tour
