बारा हजारांपेक्षा जास्त लघुउद्योजक घडवूया-विजय जोशी
रत्नागिरी, ता. 23 : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या पायावर उभे राहावे, त्यांच्यातूनही उद्योजक घडावेत आणि आजवर उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी ‘अमृत’ ही संस्था सर्वतोपरी मदत करत आहे. ‘अमृतपेठ’ हे ई-कॉमर्स पोर्टलद्वारे संबंधित गटातील अगदी लहानातील लहान उद्योजकालाही आपली दर्जेदार उत्पादने आणि सेवा कोणत्याही कमिशनविना सर्वत्र विकता येणार आहेत. १२ हजारांवर लघुउद्योजक निर्माण करून शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला हातभार लावूया, असे प्रतिपादन ‘अमृत’ या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, कोकण विभागातील पहिला अमृत मेळावा टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये झाला. त्यावेळी श्री. जोशी बोलत होते. Amrit Melawa at Ratnagiri

शासनाच्या इतर कोणत्याही प्रकारच्या योजनांचा लाभ मिळत नसलेल्या नागरिकांना योजनांचा लाभ घेता येतो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला, अधिवास दाखला अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट, आधार, पॅन आणि शाळा सोडल्याचा दाखला एवढ्याच कागदपत्रांच्या आधारे या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो. नवउद्योग अर्थात स्टार्टअप्स उभारण्यासाठी आणि ज्यांचे आधीपासूनच उद्योग आहेत त्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्यांना व्याजपरतावा देण्याची एक योजना आहे. Amrit Melawa at Ratnagiri
स्वयंरोजगार, शिक्षणविषयक, बेकरी, सोलर आणि इम्पोर्ट-एक्स्पोर्ट आदी प्रशिक्षणे, आयजीटीआर, सीआयपीईटी, एनआयईएलआयटी, सी- डॅक, एमकेसीएल आदी संस्थांची तांत्रिक व तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षणेही या अंतर्गत घेता येणार आहेत. विजय जोशी यांनी या वेळी संस्थेची स्थापना, उद्देश आणि कार्य याबद्दल विस्ताराने माहिती दिली. भविष्यातील योजनांविषयीही विजय जोशी यांनी सांगितले. Amrit Melawa at Ratnagiri

मेळाव्याला चित्पावन ब्राह्मण मंडळ, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण संघ, देवरुखे ब्राह्मण संघ, पाटीदार समाज, मरूधर समाज आदींचे प्रतिनिधी जिल्हाभरातून उपस्थित होते. ‘अमृत’चे विभागीय उपव्यवस्थापक अमित सामंत यांनी प्रास्ताविकात योजनांची तोंडओळख करून दिली. जिल्हा व्यवस्थापक महेश गर्दे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा समन्वयक अवधूत मुळ्ये यांनी आभार मानले. Amrit Melawa at Ratnagiri