गुहागर, ता. 9 : तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथून प्रमोद महादेव पालांडे (वय 47) हे बुधवार (ता. 7) पासून बेपत्ता आहेत. अशी तक्रार त्यांचा लहान भाऊ प्रविण याने गुहागर पोलिस ठाण्यात केली आहे.
प्रविण पालांडे यांने दिलेल्या माहितीनुसार प्रमोद पालांडे हे मानसिक रुग्ण आहेत. त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी (ता. 7) सायंकाळी 5 वाजता प्रमोद पालांडे हे घराजवळ असलेल्या सहाणेवर गेले होते. रात्री उशिरापर्यंत प्रमोद घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरु केली. शृंगारतळी, पालपेणे, जानवळे आदी परिसरातही प्रमोदचा शोध लागला नाही. अखेर शुक्रवारी (ता. 9) सकाळी प्रविण पालांडे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात प्रमोद बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.