चिपळूण : पूरग्रस्त भागातील २००० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप (Educational Material) आणि १०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद घेणार आहे. त्याची अनौपचारीक सुरवात अभाविप (ABVP) ज्ञानसेतू अभियानाअंतर्गत चिपळूण शंकरवाडी येथील हनुमान मंदिरमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून करण्यात आली.
चिपळूणमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक सेवाभावी संघटनांनी मदतीचा हात पुढे केला. परंतु यामध्ये शैक्षणिक क्षेत्र वंचित राहू नये, म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने शैक्षणिक साहित्य वितरणाची मोहीम हाती घेतली. शैक्षणिक आणि आरोग्य (Education and Health) या दोन विषयांमध्ये विद्यार्थी परिषद प्रामुख्याने चिपळूण येथील पूरग्रस्त भागांमध्ये सेवा देत आहे.
आरोग्य क्षेत्रात काम करताना पूरग्रस्त भागातील सुमारे 2500 व्यक्तींची सेवा अभाविपच्या डॉक्टरांच्या टीमने केली. त्यानंतर पूरग्रस्त मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून अ.भा.वि.प. ने ज्ञानसेतू अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत 2000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. तर 100 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व अ.भा.वि.प. घेणार आहे. या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे क्षेत्रिय संघटनमंत्री देवदत्त जोशी, कोंकण प्रदेश संघटन मंत्री संतोष तोनशाळ, कोंकण प्रदेश सहसंघटन मंत्री गितेश चव्हाण उपस्थित होते. तसेच भगीरथ प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती.”सुशिक्षित होण्याबरोबर सुसंस्कृत होणे गरजेचे आहे आणि त्या संस्काराचे बाळकडू पाजण्याची फार मोठी जबाबदारी पालकांची आहे” असे मार्गदर्शक वक्तव्य डॉ.देवधर यांनी केले