आमदार जाधव यांची खरमरीत टिका
गुहागर, ता. 30 : मा. शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीची विधानपरिषदेची जागा पुन्हा रत्नागिरीला मिळावी. ती जागा कुणबी समाजाला देऊन त्या समाजाचा सन्मान करा. असे म्हटल्यावर राष्ट्रवादीचे नाव घेऊन कुटुंबवादी काम करणार्या तटकरेंना मिरच्या झोंबल्या. त्यांना दिल्लीचा मार्ग दाखविण्यात माझे योगदान आहे. तरीही माझ्यावर टिका केली. माझ्या अंगावर कोणी आले तर मी सोडत नाही. तेव्हा वेळीच त्यांनी शहाणे व्हावे. अशी खरमरीत टिका आज आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (MLA Jadhav VS MP Tatkare Political War)
खासदार सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर बोलताना आज आमदार जाधव आक्रमक झाले होते. त्यांनी राजकीय इतिहासातील अनेक दाखले देत खासदार तटकरेंवर कठोर शब्दात टिका केली.
आमदार भास्कर जाधव म्हणाले की, आंबडसच्या मेळाव्यामध्ये मी खासदार सुनील तटकरे यांना आवाहन केले होते की, तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे कुणबी समाजाला 2024 मध्ये होणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा द्यावी. ती जागा राष्ट्रवादीकडे असल्यामुळे मी ते विधान केले होते. एकाच घराण्यात, स्वत:च्या मुलाकरिता चार वेळा विधान परिषद घेतात तेव्हा त्यांना सन्मान वाटतो आणि कुणबी समाजाला द्या म्हटलं तर अपमान वाटतो. यातून त्यांची मानसिकता कळते.
कुणबी समाजाच्या सामाजिक भवनाकरता दिलेल्या 5 कोटी रुपयांचे मी समर्थन केले. आणखी पैसे कमी पडले तर मा. मुख्यमंत्री महोदयांकडून आणून देईन असे मी म्हटले होते. नाव राष्ट्रवादी आणि काम मात्र आयुष्यभर कुटुंबवादी. हा शिक्का पुसण्याकरिता मी त्यांना सूचना केली की, कुणबी समाजाला जागा द्या. हा त्यांना अपमान वाटतो. याचा अर्थ विधान परिषदेच्या आमदारकीची योग्यता फक्त त्यांच्याच घराण्यात आहे. कुणबी समाजात ती योग्यता नाही. असे बोलून कुणबी समाजाचा अपमान त्यांनी केला आहे. (MLA Jadhav VS MP Tatkare Political War)
पूर्वीचे शिवसेनेचे, राष्ट्रवादीत गेलेले आणि आता शिवसेनेत गेलेले भास्कररावांचे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन. असे माझ्यावर खोचक, आणि उपरोधिक भाष्य केले. पण मार्गदर्शक करण्यासाठी ज्याचे आचार विचार चांगले असतात. ज्याचे वर्तन, राजकीय कारकीर्द स्वच्छ असते त्यांना मार्गदर्शन करणे योग्य असते. शेवटी तुम्ही खोट्या कंपन्या स्थापन करून गोरगरिबांची हजारो एकर जमीन घेतलीत, किमान 10 ते 15 हजार कोटीचा भ्रष्टाचार केलात. माया गोळा केलीत. असे तुमच्यावर आरोप झालेले आहेत. अशा महान माणसाला मार्गदर्शन करणं माझ्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे. जाण, जाणीव, नीतिमत्ता असते त्यांना मार्गदर्शन करायचं असतं.
हे केवळ मी बोलत नाही. कै. अंतुले साहेब यांनी सांगितले आहे. माजी आमदार, कै. माणिकराव जगताप तटकरेंच्या नीतिमत्तेबाबत बोलले आहेत. केलेल्या उपकारांची जाण आणि जाणीव नसलेले माणूस असा तटकरेंचा उल्लेख रवीशेठ पाटील, आर. सी. घरत, बंधू पाटील, शेकापचे जयंत पाटील देखील करतात. परवा अलिबागचे माजी आमदार पंडित पाटील यांनी केलेले भाषणही युट्यूबवर पाहिले. त्यामुळे तटकरेंना मार्गदर्शन करण्याएवढी माझी क्षमताच नाही. नम्र रहा, नीतिमत्ता बाळगा, कधीतरी द्यायची भूमिका ठेवा याच्यापेक्षा जास्त मी सांगू शकत नाही. (MLA Jadhav VS MP Tatkare Political War)
मी सेनेत होतो, राष्ट्रवादीत गेलो, पुन्हा सेनेत आलो हे जाहीरपणे सांगतो. माझ्याबद्दल उपरोधिक बोलण्यापूर्वी तटकरेंनी मागे वळून बघावे. तुम्ही सातत्याने लोकांना खोटं सांगताय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनचा मी सदस्य आहे. तुमच्यासारखा खोटारडा माणूस दुसरा कोणीही राजकारणात, कोकणपट्टीत नाही. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा तुम्ही औरंगाबादला बॅ. अंतुले यांच्याबरोबर होतात. त्याकाळी विरोधी पक्ष नेते भुजबळ यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या मिटींग होत असत. तेव्हा चिपळूणचे कै. नानासाहेब जोशी तटकरेंना तिथे घेऊन गेले. माणिकरावांना नानांनी सांगितले की, हा एक सहकारी तुझ्या जोडीला आणलयं. हे खोटं असेल तर तटकरेंनी जाहीर करावे. शेवटी माणिक जगतापच्या राजकारणाची माती तटकरेंनीच केली. त्यामुळे नीतिमत्तेच्या आणि पक्षाच्या गोष्टी तटकरेंनी सांगू नयेत. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य कधीच नव्हतात. लोकांचा विश्र्वासघात करू नका.
तटकरेंवर माझे अनंत उपकार
मी वाटच बघत होतो तटकरे माझ्या अंगावर ते कधी येत आहेत. तटकरे तुम्हाला सांगतील की, भास्कर जाधवला राष्ट्रवादीत मी घेतले, विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्यांना निवडून आणले. तटकरे हे जेव्हा सांगितली तेव्हा त्या निवडणुकीचे कवित्व मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावे लागेल.
विधान परिषदेची जागा रत्नागिरीची होती ती रत्नागिरीला द्यावी. कुणबी समाजाला देऊन त्या समाजाचा सन्मान करावा. हे मी म्हणालो तर अपमान वाटतो. नुसतच कुटुंबवादी राहू नका राष्ट्रवादी व्हा. असे सांगितले तर अपमान वाटतो. पण कोणा बरोबर तरी युती आघाडी करून आपल्या वहिनीला सभापतिपद, रोह्याच्या नगराध्यक्षपदी आपला व्याही, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी आपली मुलगी, विधानसभेला आपण, मंत्री आपण, नंतर त्या विधानसभेच्या जागेवर आपला पुतण्या, विधान परिषदेला ज्या त्यांच्या भावाने रवीशेठ पाटील यांच्या विरोधात बंडखोरी केली म्हणून सहा वर्ष पक्षातून काढून टाकले होते. पक्षाकडे फक्त माणिकराव जगतापांकडून मागणी होती. मात्र ती जागा काढून भावाला दिली. आज हे माहिती असणारे वसंतराव ओसवाल पण हयात आहेत. माझ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर विधानपरिषद मलाच हवी, खासदारकी मलाच हवी, मुलीला आमदारकी हवी, मंत्रिपद मुलीला. हे काय आहे. (MLA Jadhav VS MP Tatkare Political War)
एखादी विधानपरिषदेची जागा कुणबी समाजाला द्या म्हटले तर तटकरेंना मिरच्या झोंबणार हे माहितीच होते. तटकरेंना फक्त घ्यायचे माहिती आहे, द्यायचे माहिती नाही. हे मी जवळून पाहिले आहे. तेव्हा तटकरेंनी एवढ्यावरच शहाणं व्हावं. तुमचे उपकार माझ्यावर नाहीत. माझे उपकार तुमच्यावर आहेत. तुम्हाला दिल्लीचा मार्ग दाखविण्यात भास्कर जाधव यांचे योगदान आहे. भास्कर जाधव यांना निवडून आणण्यात तुमचे योगदान नाही. तुम्ही आतून काय काळबेरं केलेत, ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचे राजकीय वाटोळ तुम्ही कसं केलत त्यांचे अनेक पुरावे आहेत. जयंत पाटील, रवीशेठ पाटील, वसंतराव ओसवाल, अशोक साबळे, आर. सी. घरतं, माणिक जगताप अशी अनेक नावे घेता येतील. मी लवकरच रायगडमध्ये जाणार आहेत. मी वाट बघतोय माझा पक्ष मला कधी मोकळीक देतोय.
मी कुणबी समाजाचा अपमान केलेला नाही. कुणबी समाजाचा सन्मानच व्हावा म्हणून कुणबी समाजाला आमदारकी द्या असे सांगितले. 5 कोटी दिल्याबद्दल मला खंत नाही, उलट आणखी पैसे लागले तरी आम्ही देऊ असे सांगितले. या गोष्टी मी ठामपणे सांगतो. या आरोप प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही. या महाविकास आघाडीचे आम्ही छोटे अंश आहोत. तटकरेही त्यातला अंश आहेत. त्यामुळे याचा फरक पडणार नाही उलट जे चुकीचे बोलतात त्यांना वरिष्ठ योग्य सांगतील. त्यातून महाविकास आघाडी भक्कम होईल. असेही यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
(Guhagar News, News in Guhagar, Marathi News, मराठी बातम्या, ताज्या बातम्या, लोकल न्युज, टॉप न्युज, गुहागर, गुहागर न्यूज, गुहागरमधील बातम्या, Latest Marathi News, News in Marathi, Latest News, लेटेस्ट अपटेड्स, ब्रेकिंग न्युज, Breaking News, Politics, MLA Bhaskar Jadhav, MP Sunil Tatkare, Political War,)