गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये (RDCC Bank Election) चंद्रकांत बाईत, गुहागरचे शिवसेना (ShivSena) तालुकाप्रमुख सचिन बाईत आणि त्यांच्या पत्नी सौ. बाईत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सदस्य अपात्र ठरविणे आणि गुहागर (Guhagar) तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 2 संचालकांना सहकार पॅनेलने नाकारल्याची ही प्रतिक्रिया मानली जात आहे.
गुहागरच्या सहकार क्षेत्रात जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन हालचालींना वेग आला आहे. रविवारी विकास संस्थामधील निवडक संचालक, पदाधिकारी, सभासद यांची पाटपन्हाळे येथे बैठक झाली. त्यावेळी गुहागर विकास संस्था मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. काहीजणांच्या नावांची चर्चा झाली. मात्र अनेकांनी चंद्रकांत बाईत यांच्याच नावाला पाठिंबा दिला. त्यामुळे गुहागर विकास संस्था मतदार संघातून चंद्रकात तथा आबा बाईत हे निवडणूक लढविणार हे निश्चित झाले आहे. आबांनी यापूर्वी विशेष मागास प्रवर्गातून सातत्याने निवडणुक लढविली होती. त्यांच्या या पारंपारीक मतदार संघातून शिवसेनेचे गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच शेळी मेंढी आणि कुक्कुट पालन या मतदारसंघातूनही सचिन बाईत निवडणूक लढविणार आहेत. जिल्ह्यात या मतदारसंघात केवळ 25 मतदार आहेत. याशिवाय महिला राखिव मतदारसंघातून बाईत कुटुंब सचिन बाईत यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
एका बाजुला सहकार पॅनेल निवडणूक बिनविरोध करण्याच्या तयारीत असताना गुहागर तालुक्यातून जिल्हा बँकेच्या चार मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रतिकिया उमटली आहे.