पर्यटन उद्योगावर घाला की विकासकाला जागा देण्याचा घाट
गुहागर, ता. 12 : समुद्रकिनाऱ्यावरील कारवाई होवू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झटत होते. तरीदेखील मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न येता ही कारवाई केली. त्यामुळे या कारवाई मागे असे कोणते अदृष्य हात आहेत. ही कारवाई म्हणजे गुहागरातील पर्यटन उद्योग संपविण्याचा घाट घातला जातोय की ही जागा अन्य खासगी विकासकाच्या ताब्यात देण्याचा घाट घातला जातोय असे प्रश्र्न या कारवाईने निर्माण केले आहेत. (Who is behind Action?)
गुहागरमधील गेल्या तीन वर्षात घडलेल्या घटना या पर्यटन उद्योगाला फटका देणाऱ्या ठरल्या आहेत. याची सुरवात झाली तीन सी व्ह्यु गॅलरी आणि पर्यटन जेटी तोडण्यापासून. सदर निर्णय हा हरित लवादाने दिला होता. त्यानंतर हरित लवादाच्या निर्णयाच्या पार्श्र्वभुमीवर गुहागर मधील 22 पर्यटन व्यावसायिकांना सीआरझेड उल्लंघन करुन बांधकाम केल्याच्या नोटीसा पाठविण्यात आल्या. या कारवाईमुळे गुहागरमधील वातावरण बिघडून गेले होते.