श्रीराम खरे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर
गुहागर, ता. 06 : चेस इन स्कुल (Chess in School) प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव प्रशिक्षक म्हणून विवेक सोहनी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचे अभिनंदन करतो. आपल्या जिल्ह्यात चेस इन स्कुल हा उपक्रमाची राबविण्यासाठी विवेक सोहनी यांनी पुढाकार घ्यावा. जिल्हा बुद्धिबळ संघटना (Ratnagiri District Chess Association) त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल. असे प्रतिपादन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी केले आहे. ते संघटनेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते.
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting) ऑनलाइन पध्दतीने पार पडली. या सभेत पुढील ३ वर्षांकरिता रुपल केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम खरे यांची अध्यक्षपदी पुर्ननियुक्ती करण्यात आली. सचिव म्हणून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच विवेक सोहनी, रत्नागिरी बिनविरोध निवड करण्यात आली.


जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या उपाध्यक्षपदी खेडमधील रोटरी स्कुलचे संचालक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिपिन पाटणे आणि चिपळूणचे नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मोदी यांची तर निवड करण्यात आली. खजिनदारपदी फिनोलेक्स अकॅडेमीच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक मंगेश मोडक यांची आणि सहसचिवपदी रत्नागिरीतील अनुभवी बुद्धिबळ खेळाडू, राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक चैतन्य भिडे यांची निवड करण्यात आली. कार्यकारीणी सदस्य म्हणून सुभाष शिरधनकर, लोकमान्य मल्टिपर्पज कुवारबाव शाखेचे मॅनेजर सुहास कामतेकर, चिपळूण येथील व्यावसायिक रमण डांगे, उदय गांधी, शैलेंद्र सावंत, राजकुमार जैन, माजी नगरसेविका रश्मी गोखले व गुहागर येथील अमरदीप परचुरे यांची निवड करण्यात आली.
या निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना सहसचिव चैतन्य भिडे म्हणाले की, जिल्ह्यात खेळाचा प्रसार व्हावा, अधिकाधिक चांगले खेळाडू घडावेत. यासाठी शालेय स्तरापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यातूनच बुद्धिबळासारख्या खेळाचे वातावरण जिल्ह्यात तयार होईल.
खजिनदार प्रा. मंगेश मोडक म्हणाले की, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे पुढील काही महिन्यात प्रत्येक जिल्ह्यातुन दोन नवीन प्रशिक्षक, दोन नवीन पंच तसेच ४ उदयोन्मुख खेळाडू यांच्यासाठी मार्गदर्शन सत्र अत्यंत माफक शुल्कामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रशिक्षक, खेळाडू व पंच यांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला पाहिजे. या सत्राची माहितीसाठी संघटनेचे सचिव विवेक सोहनी यांच्याशी संपर्क साधावा.
जिल्हा सचिव विवेक सोहनी म्हणाले की, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ चेस इन स्कूल उपक्रमातून खेळाडू, प्रशिक्षक व पंच तयार व्हावेत यासाठी पावले उचलत आह. बुद्धिबळ खेळाची आवड असलेल्या सर्वांना योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी केल्यास रत्नागिरीमध्ये “चेस कल्चर” तयार होईल.
जिल्हा संघटनेची सूत्र बुद्धिबळासाठी काम करणाऱ्या युवा पिढीच्या हातात दिल्याने जिल्ह्यात येणाऱ्या काळात बुद्धिबळासाठी निश्चितच पोषक वातावरण तयार होईल. असा विश्वास उपाध्यक्ष बिपीन पाटणे व शशिकांत मोदी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.