खासदार सुनिल तटकरे, दोन्ही महामार्गांच्या कामाबाबत बैठक बोलावणार
गुहागर, ता. 25 : चेन्नईमधील संस्थेकडून सीआरझेड २ मध्ये वर्ग होण्याबाबतचा आराखडा आल्यावर गुहागर नगरपंचायतीचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत गुहागर सीआरझेड वर्ग २ मध्ये येईल. असा विश्र्वास खासदार सुनील तटकरे यांनी गुहागरमध्ये व्यक्त केला. तसेच महामार्गाच्या कामासंदर्भातील अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसाबेत गुहागरमध्ये बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे शुक्रवारी (ता. 24) गुहागरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या अस्तित्वात असलेल्या रानवी, बाग, वरचापाट मार्गे गुहागर बसस्थानक हाच मार्ग सागरी महामार्गासाठी निश्चित झाला तर या मार्गावरील स्थानिकांची मोठी अडचण होणार आहे. विशेषत: पश्चिम दिशेला रहाणाऱ्या लोकांची समुद्राकडून सीआरझेड आणि घरासमोर महामार्ग अशी दोन्ही बाजुने कोंडी होईल. या विषयासंदर्भात बोलताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, पत्रकारांनी ही अडचण दाखवून दिली हे चांगले झाले. सागरी महामार्गाच्या निश्चितीसाठी सरकारने सर्वेक्षण आणि आखणी करण्यासाठी एक एजन्सी नेमली आहे. या एजन्सीबरोबर माझा कायम संवाद आहे. त्यामुळे गुहागरमध्ये ते सर्वेक्षणासाठी येतील त्यावेळी स्थानिकांसोबत त्यांची बैठकीचे आयोजन आम्ही करु. स्थानिकांच्या नेमक्या अडचणी समोर आल्या की सागरी महामार्गाचा रस्ता कसा बदलायचा त्याचाही नेमका विचार करता येईल.
गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्र सीआरझेड वर्ग २ मध्ये येण्यासाठी राज्य सरकार, महाराष्ट्र सागरी किनारे क्षेत्र व्यवस्थापन समिती यांच्या संपर्कात सातत्याने आहे. सीआरझेड वर्ग २ ची प्रत्यक्ष रेषा निश्चित करण्याचे काम चेन्नईमधील संस्थेकडे आहे. हे काम पूर्ण झाल्यावर नगरपंचायत क्षेत्र सीआरझेड वर्ग २ मध्ये येण्याची प्रक्रिया केंद्र, राज्य सरकार आणि एमसीझेडएमए कडून होईल. ही संपूर्ण प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय पूर्णपणे मार्गी लागेल. नगरपंचायतीला विकास आराखडा हा लवकरात लवकर मंजूर करुन घ्यावा लागेल. परंतू सीआरझेड वर्ग २ मध्ये येण्यासाठी विकास आराखडा नसल्याने अडचण निर्माण होणार नाही.
गुहागर विजापूर महामार्गाच्या कामांसंदर्भात बोलताना खासदार तटकरे म्हणाले की, महामार्गाबाबात अनेक तक्रारी माझ्याकडेही आल्या आहेत. पुढच्या महिनाभरात पुन्हा गुहागरचा दौरा करणार आहे. त्यावेळी गुहागर विजापूर महामार्गाचा ठेकेदार, येथील अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत एका बैठकीचे आयोजन करतो. या बैठकीमध्ये पत्रकारांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी निकृष्ट दर्जाचे काम, कामामधील अडचणी, आदी विषयांवर सविस्तर चर्चा करु. तसेच महामार्गाचे अर्धवट काम गतीने पूर्ण कसे करता येईल. या संबंधीही अधिकाऱ्यांसमक्ष ठेकेदाराला सूचना करु.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि गुहागर तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर उपस्थित होते.
The way to Guhagar Nagar Panchayat will be clear when the Chennai-based organization comes up with a plan to be included in CRZ 2. Pursuit is underway for that. Guhagar will be in CRZ Class 2 till the coming winter session. This belief was expressed by MP Sunil Tatkare in Guhagar. He also said that a meeting will be held in Guhagar with the concerned officials to resolve the problems and grievances related to the highway work.