तळवलीतील घटनेने ग्रामस्थ सुन्न, पोलीस जावयाच्या शोधात
गुहागर, ता. 09 : जावयाने जीवंत काडतूस सिंगल बॅरल बंदुकीत टाकून ती सासऱ्यावर रोखून धरली. सासूने दिराला कळवल्यावर दिर ग्रामस्थांना घेवून धावत घरात शिरला. या गडबडीमुळे जावई गोंधळला. हीच संधी साधून सासऱ्याने बंदूक खेचून घेतली. आता लोक आपल्याला मारणार हे कळताच जावयाने तेथून पोबारा केला.
ही थरारक घटना तळवली देवुळवाडीमध्ये बुधवार, ता. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. या घटनेची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात बुधवारी 8 सप्टेंबरला रात्री 7 वा. दाखल करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार तळवली देवूळवाडी येथे रहाणारे चंद्रकांत भागोजी शिगवण (वय 59) हे इलेक्ट्रीशियन आहेत. त्यांची मुलगी सौ. प्रणिता हिचा विवाह वडद येथील श्रीकांत रमेश कातकर यांच्याशी झाले आहे. श्रीकांत रमेश कातकर हे व्यसनी असून ते प्रणिताला मारहाण करत असतं. ही गोष्ट प्रणिताने आपल्या वडिलांना (चंद्रकांत शिगवण) यांना सांगितली. त्यामुळे चंद्रकांत शिगवण आपल्या मुलीला सौ. प्रणिताला तळवली देवूळवाडी (माहेरी) घेवून आले. या गोष्टीमुळे जावई श्रीकांत चिडला होता. बुधवारी (ता. 8) सकाळी 11 च्या सुमारास श्रीकांत वडदहून चंद्रकांत शिगवण यांच्या घरी आला. त्याने आपल्या पत्नीला परत सासरी पाठवावे अशी मागणी सासु सासरे यांना केली. तर प्रणिताला देखील माझ्याबरोबर घरी चल असे सांगत होता. मात्र चंद्रकांत शिगवण यांनी या गोष्टीला विरोध केला.
त्यामुळे चिडलेल्या श्रीकांतने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. आणि सोबत आणलेल्या सिंगल बॅरल बंदुकीत एक जीवंत काडतूस टाकून ती बंदूक सासरे चंद्रकांत शिगवण यांच्यावर रोखली.
घरातील मंडळी हे पाहून घाबरली. त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्याचवेळी प्रसंगावधान राखून चंद्रकांत शिगवण यांच्या पत्नीने आपल्या दिरांना मोबाईलवरुन फोन केला. समोर घडत असलेला प्रसंग सांगितला. तत्काळ दिर आजुबाजूच्या ग्रामस्थांसह चंद्रकांत शिगवण यांच्या घरी आले. एकदम काही ग्रामस्थ घरात घुसलेले पाहून श्रीकांत कातकर गोंधळला. हीच संधी साधून चंद्रकांत शिगवण यांनी श्रीकांतच्या हातातील बंदूक खेचून घेतली. लोक मारतील या भितीने श्रीकांतने तेथून पोबारा केला.
या घटनेची फिर्याद चंद्रकांत शिगवण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तसेच श्रीकांत कडून खेचून घेतलेली बंदूक आणि जीवंत काडतूसही पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. सदर बंदूक ही विनापरवाना, बेकायदेशीर, गावठी बनावटीची सिंगल बॅरल असून तिची एकूण लांबी 126 से.मी आहे. तिची किंमत सुमारे 10 हजार रुपये आहेत. जीवंत काडतून लाल रंगाचे असून त्याची किंमत 100 रुपये आहे.
या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी तळवली देवूळवाडी येथील चंद्रकांत शिगवण यांच्या घरी जावून घटनेचा पंचनामा केला आहे. सदर घटनेत वापरलेली बंदूक आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. पोलीस फरार झालेल्या श्रीकांत कातकरचा शोध घेत आहेत.
Unlicensed, illegal, Home made, Single Barrel, Gun, Maharashtra Police, Guhagar, Police Station, Sun in Law, Father in Law, Aiming gun on Father in law,