गुहागर दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचे आवाहन
गुहागर, ता. 05 : गणेशोत्सवाच्या काळात परगावातून अनेकजण कोकणात दाखल होतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होवू नये. आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. त्याचवेळी कोविड स्थिती नियंत्रणात ठेवता यावी. प्रशासनाने हा गाभा डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले आहे. हे नियोजन यशस्वी करण्यामध्ये जिल्हावासीयांचे सहकार्य महत्त्वाचे राहील. अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी पत्रकारांना दिली. During Ganeshotsav, many people from various cities will come in Konkan. They should not be bothered under any circumstances. Ganeshotsav should be celebrated with joy. At the same time the covid condition should be kept under control. The administration has planned with this core in mind. The cooperation of the district residents will be important in making this planning a success. Such information was given by the District Collector of Ratnagiri, Dr. B. N. Patil told reporters.
डॉ. पाटील दापोलीचा प्रशासकीय दौरा पार पडल्यानंतर शनिवारी, गुहागरला आले होते. त्यांनी गुहागर तालुक्यातील कोविड नियोजनाची माहिती घेतली व प्रशासनाला गणेशोत्सवातबाबत केलेले नियोजन, त्याची अंमलबजावणी कोणी करावी. या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होणार
परगावातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद आपण ठेवणार आहोत. एस.टी.द्वारे येणाऱ्या प्रवाशांची माहिती आगारातून तहसीलदार कार्यालयाकडे येईल. खासगी प्रवासी वाहनधारकांनी बसमधील प्रवाशांची माहिती जिल्ह्यात प्रवेश करताना तपासणी नाक्यावर आर.टी.ओ. किंवा पोलीसांकडे दोन प्रतीत द्यायची आहे. या संदर्भातील फॉर्मच्या नमुन्यांचे वितरण करुन झाले आहे. जे खासगी वाहनाने येतील, त्यांच्यासाठी ऑनलाइन गुगल फॉर्मची व्यवस्था आम्ही केली आहे. सदर फॉर्म त्यांनी भरुन पाठवावा. न भरल्यास तपासणी नाक्यावर भरुन द्यावा. या नियोजनामुळे गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद होईल. मात्र प्रवासात अडथळा येणार नाही. वाहतुक कोंडी होणार नाही.
चेकपोस्ट, एस.टी आगार, जिल्हा नियंत्रण कक्ष अशा विविध ठिकाणी संकलीत झालेली माहिती तालुका प्रशासनाकडे पाठविण्यात येईल. या माहितीमधून गावनिहाय दोन वेळा लसीकरण झालेल्या व्यक्ती, गणेशोत्सवाला येण्यापूर्वी कोरोना टेस्ट केलेल्या व्यक्ती अशी वर्गवारी करण्यात येईल. सदर वर्गवारी ग्रामकृतीदलाकडे हस्तांतरीत केली जाईल. ज्यांनी कोरोना टेस्ट केलेली नाही त्यांची टेस्ट करुन घेणे, कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, त्यांची टेस्ट करुन घेणे, त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे ही कामे ग्राम कृती दलाने करावयाची आहेत. बाहेरगावातून गणेशोत्सवासाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला नाहक त्रास होणार नाही. त्याचबरोबर गावात कोरोना संक्रमण होणार नाही. याची काळजी ग्रामस्थांनी घ्यायची आहे. जर एवढी काळजी आपण घेतली तर गणेशोत्सव आनंदात पार पडेल तसेच आटोक्यात आलेली कोरोनाची स्थितीही वाढणार नाही.
कुटुंबाचा गणेशोत्सव
यावर्षी गणेशोत्सवांवर कडक निर्बंध नाहीत. पण कोरोना संक्रमण रोखण्यासाठी यावर्षी घरातल्या घरात गणेशोत्सव साजरा करण्याची विनंती प्रशासन करत आहे. गर्दी टाळण्यासाठी, गावाने, वाडीने एकत्र येवून आरत्या, भजन करणे, जाखडी नाच करणे यावर आपण थोडी बंधने घालतोय. घरच्या घरी सर्वांनी आनंदाने आरती, भजन, नाच करावा. आपण घरी येणाऱ्या दर्शनार्थीना पेढे, बर्फी आदी प्रकारचा ओला प्रसाद देतो. यावर्षी कोणीही ओला प्रसाद देवू नये. त्याऐवजी सुखा प्रसाद द्यावा.
प्लास्टीकवर निर्बंधच
गणेशोत्सव साजरा करताना प्लास्टीकची फुलांच्या माळा, थर्माकोलचे डेकोरेशन, प्लास्टीकचे पेले, चमचे, पिशव्या आदी पर्यावरण घातक वस्तुंचा वापर करु नये. अशा पर्यावरणासाठी घातक, नष्ट न होणाऱ्या, पुर्नवापर न होणाऱ्या वस्तुंवर न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे त्याची विक्री करणे आणि वापर करणे दोन्ही बेकायदा आहे. 2018 च्या सुधारीत कायद्यानुसार ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, पोलीस या यंत्रणांना कायदेशीर कारवाईची परवानगी आहे. त्यामुळे या यंत्रणांनी बंदी असलेल्या वस्तू विक्री करताना किंवा वापरताना कोणी आढळ्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु ही वेळच प्रशासनावर येणे योग्य नाही. कोकणातील पर्यावरणाला हानी पोचेल अशा वस्तु गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवात कोणी वापरुच नये असे आवाहन आम्ही करत आहोत.