चंद्रशेखर जोशी, दापोली यांच्या सौजन्याने
दाभोळ : दापोली तालुक्यातील देवके येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची आज सायंकाळी वनविभागाचे अधिकारी व दापोलीतील सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांनी फासकीतून सुखरूप सुटका केली असून त्याला पिंजऱ्यात भरून दापोली येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले असून लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती दापोलीचे वनपाल सावंत यांनी दिली आहे.
The leopard was rescued from the trap at Devke in Dapoli taluka this evening by Forest Department officials and members of the Dapoli-based Sarpmitra Association.


या संदर्भात माहिती देताना वनपाल सावंत म्हणाले की, देवके येथील विरवी फार्म हाऊस कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक बिबट्या फासकीत अडकला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आज सायंकाळी 4 वाजता मिळाल्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवके येथे कर्मचार्यांसह धाव घेतली, या बिबट्याच्या कंबरेला फास लागला होता, वनविभागाच्या अधिकाऱ्यानी या बिबट्याची फासकीतून मुक्तता करून त्याला पिंजऱ्यात भरले व दापोली येथील वनविभागाच्या कार्यलयात आणले, हा बिबट्या नर जातीचा असून 7 वर्षांचा आहे.
या सुटकेच्या कारवाईत दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे, दापोलीचे वनपाल सावंत, खेडचे वनपाल सुरेश उपरे,मंडणगडचे वनपाल अनिल दळवी, वनरक्षक जळणे, जगताप, डोईफोडे, ढाकणे, मंत्रे, वनसेवक संजय गोसावी, दापोलीचे सर्पमित्र सुरेश खानविलकर, किरण करमरकर व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.