सारीका हळदणकर, सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे काम अशक्य
गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातील 7 बीटमधील 185 अंगणवाडी सेविकांनी आज शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात परत केले. निकृष्ट दर्जाचे हॅण्डसेट सातत्याने बिघडतात. दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांनाच करावा लागतो. पोषण ट्रकर ॲप वापरण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे मोबाईल जमा करत असल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभा मुंबईच्या गुहागर अध्यक्षा सौ. सारिका हळदणकर यांनी सांगितले.
सौ. सारीका हळदणकर म्हणाल्या की, केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर हे मोबाईल अॅप विकसीत केले. या ॲपवर अंगणवाडी क्षेत्रातील स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, लाभार्थींची नावे, वजन, उंची, हजेरी आणि पोषण आहाराचे वाटप यांची माहिती दररोज भरणे अनिवार्य करण्यात आले होते. त्यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकाला दोन वर्षांपूर्वी 2 जीबी रॅमचा मोबाईल हॅण्डसेट देण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनी हॅण्डसेटमध्ये सातत्याने बिघाड सुरु झाला आहे. शासन दुरुस्तीचा खर्चही देत नाही. इंटरनेटचा वेग कमी असल्याने माहिती चटकन भरली जात नाही. अॅप इंग्रजीमध्ये असल्याने अनेक सेविकांना त्रयस्थाची मदत घ्यावी लागते. ॲपमध्ये चुकीचा तपशील खोडणे किंवा दुरुस्त करण्याचा पर्याय नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका वैतागल्या होत्या.
हा प्रश्र्न केवळ गुहागरचा नसून राज्याचा असल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीने महिला व बालकल्याण मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त एकात्मिक बाल विकास यांची भेट घेवून अडचणी सांगितल्या. मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय सांगत मान्यवरांनी समस्या सोडविण्यास असमर्थता दर्शवली. म्हणून 9 ऑगस्टला कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी निकाल लागेपर्यंत ॲपवर माहिती न भरता आल्यास मानधन कापू नये असे आदेश न्यायालयाने दिले.
त्यानंतर गुहागरमधील अंगणवाडी सेविकांनी नादुरुस्त मोबाईल 26 ऑगस्टला जमा करण्याबाबतचे पत्र प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास योजना यांना दिले. त्याप्रमाणे आज 185 अंगणवाडी सेविकांनी पर्यवेक्षिका अश्विनी पाटील आणि मोबाईल विभागाचे प्रमुख नितेश मालप यांच्याकडे जमा केले.
1 लाख मोबाईल जमा करणार
राज्यभरातील 1 लाख 5 हजार 592 अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले मोबाईल हॅण्डसेट परत करणार आहेत. 17 ऑगस्टपासून आजपर्यंत सुमारे 25 हजार मोबाईल जमा केले आहेत. अशी माहिती महाराष्ट्र पूर्ण प्राथमिक सेविका आणि मदतनीस महासंघ, कोल्हापूरच्या अध्यक्षा सुवर्णा तळेकर यांनी दिली.