अहवालातून झाले स्पष्ट, वेळणेश्र्वरमधील प्रकरणावर पडदा पडला
गुहागर, ता. 15 : वेळणेश्र्वर गुढेकरवाडीत उतरविण्यात आलेला अज्ञात रासायनिक पदार्थ म्हणजे वाळूमधील टाकावू सिलीका पावडर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सिलीका वेस्टमुळे पर्यावरणाला व जीविताला कोणताही अपाय नाही. असा चाचणी अहवाल जागा मालकांनी सादर केला. पूर्वकल्पना न देता टाकावू सिलिका पावडर वेळणेश्र्वरमध्ये आणल्याबद्दल संबंधितांनी दिलगीरी व्यक्त केली. तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनुसार सदर सिलिका वेस्टची विल्हेवाट लावली जाईल. असे लेखी पत्र ग्रामपंचायत, पोलीस आणि महसुल प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यामुळे वेळणेश्र्वर मधील संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला आहे. वेळणेश्र्वरमधील गुढेकरवाडीतील खासगी जमिनीत सुमारे 16 टन अज्ञात रासायनिक पदार्थ उतरविण्यात आला. पावसामुळे या गोणीतील पदार्थ पाण्यात मिसळल्याने पाणी दुषित झाले. काही जणांच्या पायांची आग झाली. त्यामुळे 14 ऑगस्टला वेळणेश्र्वरमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


15 ऑगस्टला गुहागर पोलीस ठाण्यात जागामालक आणि तळोजामधील उद्योजक रविश मुसळे आणि वेळणेश्र्वरचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच व अन्य ग्रामस्थ उपस्थित झाले. वेळणेश्र्वर ग्रामपंचायतीच्या वतीने सदर प्रकरणातील तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दिला. तसेच रविश मुसळे यांनीही सदर अज्ञान रासायनिक पदार्थ म्हणजे सिलिका वेस्ट असून ते धोकादायक नाही असा प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल पोलीसांना आणि वेळणेश्र्वरच्या ग्रामस्थांना दिला. प्रक्रिया केलेली पावडर सदृष्य दिसणारा पदार्थ म्हणजे वाळूच आहे. मात्र ती पाण्यात विरघळत नाही. फक्त काही गोणी फुटल्याने त्यातील पावडर स्वरुपात असलेली वाळू पाण्याबरोबर वाहून गेली. म्हणून पाण्याचा रंग बदलला. पायाची आग होण्यासारखे वाळूच्या पावडरमध्ये काहीही नाही. कदाचित नव्या पदार्थाच्या स्पर्शामुळे थोडावेळ आग झाल्यासारखे वाटले असावे. असे स्पष्टीकरण यावेळी मुसळे यांनी केले. ते सर्वांना मान्य झाले.
जागामालक मुसळे यांनी सदर माल येण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा अन्य शासकीय यंत्रणेला न कळवले असते तर हा गोंधळ झालाच नसता. असे सरपंच चैतन्य धोपावकर यांनी सांगितले. तसेच सदर मालमत्ता सांभाळण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी चुकीच्या पध्दतीने बोलली. त्यामुळे ग्रामस्थ अधिक संतापले. मुसळे यांनी अधिकाऱ्यांना गुहागरात येवून भेटतो असे सांगितल्याने आणखी गुढता वाढली. त्याऐवजी तपासासाठी आलेल्या यंत्रणेला मुसळेंनी आधीच या सर्व गोष्टी पाठवल्या असत्या तर हे प्रकरण वाढलेच नसते. अशी माहिती वेळणेश्र्वरच्या ग्रामस्थांनी पोलीस आणि मुसळेंना दिली. अखेर मुसळे यांनी दिलगीरी व्यक्त केली आणि संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला.
प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर सिलिका वेस्ट हे जमीनीमध्ये गाडून टाकण्यात येते. त्याप्रमाणे जेसीबी आणून सुमारे 16 टन सिलिका वेस्ट मुसळे त्यांच्या जागेत खड्डा खणून त्यात गाडणार आहेत. त्याची कार्यवाही देखील सुरु झाली आहे.
यावेळी वेळणेश्र्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर केळकर, पोलीस पाटील संजय घर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक शितप, जागामालक रविश मुसळे आदी उपस्थित होते.