गुहागर, ता. 14 : तालुक्यातील धोपावे तरीबंदर येथील फेरीबोट तिकिट गृहामागील शौचालयालगतच्या खाजणात एक नवजात अर्भक सापडले आहे. हे अर्भक स्त्री जातीचे असून 14 ऑगस्ट 2021 ला सायंकाळी त्याचा जन्म झाला आहे. रात्री 10 च्या सुमारास गुहागर पोलीस तेथे पोचले असून अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे धोपावे, तरीबंदर परिसरात खळबळ उडाली आहे. गुहागर तालुक्यात अशा प्रकारे नवजात अर्भक बेवारस सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, धोपाव्यातून दाभोळकडे जाणारा एक प्रवासी रात्री 9 च्या सुमारास लघुशंकेसाठी धोपावे फेरीबोट तिकिट गृहामागील शौचालयात गेला. त्यावेळी त्याला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्याचवेळी शौचालयाच्या आजुबाजुला त्याला रक्त सांडलेले दिसले. तो प्रवासी घाबरला. ही गोष्ट त्या प्रवाश्याने धोपावे फेरीबोट तिकीटगृहातील कर्मचाऱ्यांना सांगितली. लगेचच सर्वानी तिकीटगृहामागे धाव घेतली. शोधाशोध सुरु केली. तेव्हा खाडीच्या किनाऱ्यालगत असलेल्या खाजणात नवजात अर्भक दिसले. तरीबंदर मधील एका तरुणाने खाडीकिनारी उतरुन सदर नवजात अर्भकाला बाहेर काढले. कपड्यात गुंडाळले. आणि तिकिटगृहाजवळीत प्रवासी प्रतिक्षाकक्षात ठेवण्यात आले. दरम्यान फेरीबोट कर्मचाऱ्यांनी ही माहिती गुहागर पोलीसांना दिली.
रात्री 10 वाजता गुहागरचे पोलीस उपनिरिक्षक दिपक कदम महिला पोलीसांसह घटनास्थळी पोचले. शौचालयाची पहाणी केली. आजुबाजुच्या महिलांजवळ महिला पोलीसांनी चौकशी केली. स्थानिक महिलांनी सदर नवजात अर्भकाचा जन्म अन्यत्र झाला असावा. त्यानंतर अर्भकाला बेवारस सोडण्यात आले असावे. अशी शक्यता वर्तवली. पोलीसांनी अर्भक सापडले त्या ठिकाणाची तपासणी केली असता नाळही तेथेच सापडली. तेथील सीसीटीव्ही फुटेजही पोलीसांनी पडताळून पाहिले. त्यानंतर नवजात अर्भक आणि सापडलेली नाळ घेवून पोलीस गुहागरला परतले.
सदर नवजात अर्भक हे स्त्री जातीचे असल्याने अनेक तर्क लढवले जात आहेत. सदर अर्भकाचा जन्म दुसरीकडे झाला हा तर्क खरा असेल तर मुलगी नको म्हणून नवजात बालकाला टाकून तर देण्यात आले नाही ना. अशी एक शक्यता आहे. अनैतिक संबंधातून जन्मला आलेले बालक असल्यास ती कुमारी माता धोपावे, तरीबंदर, नवानगर किंवा दाभोळ परिसरातील असु शकते. अशा अनेक चर्चा घटनास्थळी सुरु होत्या.