हातीस : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम
रत्नागिरी, ता. 14 : नारळाचे रोप लावून पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हातीस (ता. रत्नागिरी) गावी येत्या स्वातंत्र्यदिनी कल्पवृक्षाची ७५ रोपे लावली जाणार आहेत. १३ ऑगस्ट रोजी नारळाची विविध जातींतील रोपे वितरित करून या आगळ्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या वेळी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, कॅप्टन दिलीप भाटकर आणि ज्येष्ठे नेते कुमार शेट्ये प्रमुख उपस्थित होते. (Plantation of 75 Coconut saplings on Independence Day.)
हातीस गाव आकाराने छोटे असले तरी अनेक अभिमानास्पद गोष्टींनी बहरलेले आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे साक्ष देणारा बाबरशेख बाबांचा दर्गा, संगीतरत्न कै. एकनाथबुबा हातीसकर यांच्यासारखे सुपुत्र आणि त्याच जोडीला पहिल्या स्वातंत्र्यदिनाची साक्ष देणारा आणि आजही डौलाने उभा असलेला 74 वर्षांचा कल्पवृक्ष ही हातीस गावाची वैशिष्ट्ये आहेत.
यासंदर्भात माहिती देताना हातीस ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष दिलीप नागवेकर म्हणाले, भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. रत्नागिरी या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातीस गावात त्यावेळी कोणत्याही प्रकारची दळणवणाची सोय नव्हती. रत्नागिरीला जाण्यासाठी नदी-नाले ओलांडून सुमारे अडीच तासांची पायपीट करावी लागत असे. स्वातंत्र्याची बातमी सर्व भारतभर पसरली, तशी हातीस गावातही पोहोचली. त्या काळातील तरुण ग्रामस्थ देशाच्या स्वातंत्र्याची बातमी ऐकताच एकत्र आले. सर्वांच्या अंगात स्वातंत्र्याचा उत्साह भरला होता. गावात वीज नव्हती त्यामुळे उपलब्ध असलेल्या बॅटऱ्या बांबूला बांधून, कंदील, बत्त्या पेटवून ढोलताशांच्या गजरात स्वातंत्र्याची मिरवणूक काढण्यात आली. त्याकाळी हातीसच्या किनाऱ्यावर नारळ-सुपारीच्या बागा होत्या. नारळ हे कोकणातील माणसांचे दैवतच. त्यामुळे आनंदाच्या परमोच्च क्षणी हातीसमधील तरुणांनी नारळाचे एक रोप 15 ऑगस्ट 1947 ला भैरी-जुगाई मंदिरात लावण्याचे ठरले. ढोल-ताशांच्या गजरात त्या रोपाची मिरवणूक काढण्यात आली. स्वातंत्र्य दिनाची आठवण म्हणून कल्पवृक्षाची लागवड करण्यात आली. दरवर्षी या नारळाच्या झाडाची पूजा व वाढदिवस पारंपरिक पद्धतीने केला जातो.
यावर्षी 74 वा स्वातंत्र्यदिन असून पुढचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ नारळ रोपे लावण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. त्यासाठी टी-डी, डी-टी, कोकण भाट्ये १, प्रताप, लक्षद्वीप, फिलिपिन्स, ऑरेंज डॉर्फ आणि केराबस्तर या जातीची नारळाची रोपे उपलब्ध करुन देवून डॉ. श्रीरंग कद्रेकर, राजाभाऊ लिमये आदी मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केले आहे.
नारळ रोपांच्या वितरणाच्या कार्यक्रमाला हातीसच्या सरपंचासह हातीस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. तुषार नागवेकर, विजय नागवेकर, उपाध्यक्ष दिवाकर नागवेकर, जयवंत नागवेकर, राजेंद्र नागवेकर यांच्यासमवेत ग्रामस्थ उपस्थित होते.
कल्पवृक्ष लावून भारताचा पहिला स्वातंत्रदिन साजरा करणारे हातीस हे देशातील एकमेव गाव आहे. या कल्पवृक्षांची जोपासना ग्रामस्थ आजही श्रध्देने करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा 75 नारळमाड लावण्याचा संकल्प करुन देशासमोर हातीसच्या ग्रामस्थांनी आदर्श उभा केला आहे.
– श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरु, कृषी विद्यापीठ दापोली