ग्रामस्थ संतप्त, शासकीय अधिकाऱ्यांनी केली पहाणी
गुहागर, ता. 14 : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वेळणेश्र्वर मधील नदीचे पाणी दूषित झाले. शोध घेतला असता गुढेकर वाडी परिसरातील डोंगरात तळोजा एमआयडीसीतून आणलेल्या रासायनिक पदार्थाच्या गोणी उतरविण्याचे काम सुरु होते. संतप्त ग्रामस्थांनी तातडीने ट्रक अडकवून शासकीय अधिकाऱ्यांना बोलावले आहे. संबंधित जागा मालकावर कडक कारवाई करावी. अशी मागणी सरपंचांसह, ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर गुडेकर वाडी परिसरातील डोंगरात 13 ऑगस्टला रात्री एक ट्रकमधुन रासायनिक पदार्थाच्या गोणी उतरविण्यात आल्या होत्या. पावसामुळे हा रासायनिक पदार्थ विरघळू लागला. आणि पांढऱ्या रंगाचे पाणी वाहत जावून नदीला मिळाले. नदीच्या पाण्याचा रंग बदलला तसेच पाण्याला उग्र वास येत होता. त्यामुळे गावात चर्चा सुरु झाली. अखेर जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, सरपंच चैतन्य धोपावकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. संपदा केळकर, माजी सरपंच नवनीत ठाकूर आणि ग्रामस्थांनी शोध सुरु केला. त्यावेळी डोंगरातील मुसळे नामक व्यक्तीने खरेदी केलेल्या जागेत रासायनिक पदार्थ उतरवल्याचे लक्षात आले. सर्वजण घटनास्थळी दाखल झाले तेव्हा एका ट्रकमधुन माल उतरवुन झाल्याचे आणि दुसऱ्या ट्रकमधील माल उतरवत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. संतप्त ग्रामस्थांनी तातडीने काम थांबवून चौकशी केली. त्यावेळी सदर माल तळोजा एमआयडीसीतून आल्याचे ट्रकमधील कामगारांनी सांगितले. मात्र त्याच्याकडे मालाचा तपशील देणारा कोणताही कागद नव्हता. यावेळी काही जणांनी तेथे साचलेल्या दूषित पाण्यात पाय टाकला. तेव्हा पायाची आग होत असल्याचे लक्षात आले. तसेच संपूर्ण परिसरात उग्र वास येत होता. त्यामुळे सरपंचांनी पोलीस, तहसील प्रशासनाला घटनास्थळी बोलावले आहे.
याबाबत सरपंच चैतन्य धोपावकर म्हणाले की, पोलीस प्रशासन घटनास्थळी पोचले असून कामगार, ट्रकचालक आणि जागेचा व्यवस्थापक यांची चौकशी करत आहेत. तलाठ्यांनी देखील पंचनाम केला असून सुमारे 16 टन अज्ञात रासायनिक पदार्थांच्या गोणी आणि ट्रक ताब्यात घेतला आहे. स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर पुढील कारवाई पोलीस व महसुल प्रशासन करणार आहे. सदर रासायनिक पदार्थामुळे वेळणेश्र्वर मधील नदी दुषित झाली आहे. अन्य जलस्त्रोत दुषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली आहे.