गुहागर : गेली तीन वर्ष तहसिलदार पदी यशस्वीपणे काम पाहणाऱ्या सौ. लता धोत्रे यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर रिक्त जागी राजापुर तालुक्याच्या तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची नियुक्ती झाली आहे. सौ. वराळे यांनी सोमवारी गुहागर तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, नगरसेविका सौ.मृणाल गोयथळे, तालुका कोषाध्यक्ष आणि नगरसेवक समीर घाणेकर, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते नरेंद्र वराडकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष मंदार पालशेतकर यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन नूतन तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे स्वागत केले आणि पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
सौ प्रतिभा वराळे यांनी 2 जून 2017 रोजी राजापूर तहसिलदार पदाचा पदभार स्विकारल्यानंतर आज पर्यंत महसूल प्रशासनाचा कारभार लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कशा पोचतील याकडे लक्ष देतानाच 100% सातबारा संगणीकरण करत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे. राजापूर तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ अशा कठीण प्रसंगातही त्यानी कामाचे योग्य नियोजन करून वादळग्रस्ताना दिलासा दिला होता. अतिवृष्टीत 24 तास प्रत्यक्ष फिल्डवर राहून त्यांनी काम पाहिले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व राजापूर तालुकावासियांना एकत्र करत विशेष नियोजन केले होते. अशा कर्तृत्ववान तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे या गुहागर मध्येही सर्व गुहागरवासियांना एकत्र घेऊन लोकाभिमुख कामकाज करतील अशी अपेक्षा व्यक्त भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.