गुहागर, ता. 08 : विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भिती घालवण्यासाठी आरेगावांतील सानिका महाजनने इंग्रजीचे मोफत शिकवणी घ्यायला सुरुवात केली. तिचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आणि एप्रिल ते जून या तीन महिन्यात चार बॅचमधुन 500 हून अधिकांनी जणांनी या वर्गपाठांचा फायदा करुन घेतला. आता शिकवणीला येणाऱ्यांची संख्या अमर्यादित झाल्याने सानिकाने ऑनलाईन फेसबुक लाईव्हचा पर्याय निवडला आहे.
ही गोष्ट आहे आरेगावांतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कै. वासुदेव महाजन आणि श्रीम. वसुंधरा महाजन यांच्या नातीची. कु. सानिका शशिकांत महाजन सध्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जैवतंत्रज्ञानच्या (बायोटेक) दुसऱ्या वर्षात शिकत आहे. कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने ती आरे येथेच रहात होती. आजुबाजुच्या विद्यार्थ्यांजवळ चौकशी केल्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑनलाईन शिक्षणाकडेही विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे तिच्या लक्षात आले. काही पालक पाल्याला गणित, शास्त्र विषयाच्या विशेष वर्गांना पाठवतं पण इंग्रजी भाषा असल्याने त्याकडे दुर्लक्ष होतय. विद्यार्थ्यांचे बेसिक इंग्रजी कच्चे असेल तर भविष्यात त्याच्यासमोर अडचणी उभ्या रहातील. हे लक्षात घेवून तिने ऑनलाईन बेसिक इंग्लिश ग्रामर मोफत शिकवण्यासंदर्भात एक पोस्ट माध्यमांवर टाकली. त्यातून सानिकाकडे पहिले 100 विद्यार्थी इंग्रजी व्याकरण शिकु लागले.
घरात इंटरनेटसाठी आवश्यक रेंज येत नाही म्हणून सानिका दररोज नियमितपणे शिकवणी घेण्यासाठी घरापासून 10 मि. दूर असलेल्या मंदिरात जात असे. मोबाईल, एक फळा, खडू, इयरफोन आणि मोबाईल स्टॅण्ड एवढ्या साहित्यावर ति 100 ते 150 जणांची ऑनलाइन शिकवणी घ्यायची. आजपर्यत या मोफत शिकवणी उपक्रमाचा फायदा महाराष्ट्रातील 500 हून अधिक जणांनी करुन घेतला. त्यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक, कार्पोरेटमधील उच्च पदस्थ, शासकीय कर्मचारी, कामगार अशा विविध श्रेणींचा सहभाग आहे.
सातत्याने वाढणारी विद्यार्थी संख्या लक्षात घेवून सानिकाने आता ऑनलाईन शिकवणी वर्ग बंद केले आहेत. त्याऐवजी 9 ऑगस्टपासून दररोज रात्री 8 ते 9 फेसबुकद्वारे लाईव्ह शिकवणी सुरु करत आहे.
तर्खडकरांच्या व्याकरणारचे संदर्भ
भाषचे व्याकरण समजले की, भाषा शिकणे सोपे जाते. आणि तर्खडकरांनी इंग्रजी व्याकरण आपल्या पुस्तकात अत्यंत सोप्या पध्दतीने सांगितले आहे. त्यामुळे त्याच पुस्तकाचा आधार घेवून ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास मी निश्चित केला आहे.
– सानिका महाजन