रामचंद्र आपटे; रत्नागिरी अधिवक्ता परिषदेतर्फे संवाद बैठक
रत्नागिरी : संसदेत कायदा मंजूर होण्यापूर्वी जे नव्या कायद्याचे प्रारूप येते त्यावर अभ्यासगट नेमून अभ्यास करून त्रुटी सांगण्यासाठी परिषदेचा प्रयत्न सुरू आहे. समाजातील दुर्बल, वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे याकरिता परिषदेने काम केले पाहिजे. समाजाभिमुख काम करणे ही खरी लोकमान्य टिळकांना खरी श्रद्धांजली ठरेल. टिळक हे तेलातांबोळ्यांचे नेते होते. त्यांच्या अंत्ययात्रेत समाजातील लाखो लोक सामील झाले होते. ते खऱ्या अर्थाने लोकमान्य होते. आज पुन्हा एकदा वकिलांनी समाजाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे कोकण प्रांत अध्यक्ष राम आपटे यांनी केले.
(The council is trying to find out the error by appointing a study group on the draft of the new law before the law is passed in the parliament. The Council should work for justice for the weaker and deprived sections of the society.)
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त अधिवक्ता परिषदेच्या जिल्हा कार्यकर्ता संवाद बैठक कार्यक्रमात ते बोलत होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मिराताई खडककार यांच्या सूचनेनुसार आज कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, उपाध्यक्ष ॲड. श्रीरंग भावे, सरचिटणीस ॲड. मिलिंद जाडकर, उपाध्यक्ष ॲड. प्रिया लोवलेकर आणि रत्नागिरी तालुकाध्यक्ष मनोहर जैन उपस्थित होते. लोकमान्य टिळकांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात झाली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये चिटणीसपदी संदेश शहाणे यांची व कोषाध्यक्ष म्हणून हृषिकेश कवितके यांची नियुक्ती करण्यात आली. ॲड. योगेश खाडिलकर यांनी लोकमान्यांविषयी माहिती दिली. ॲड. शेट्ये यांनी भारतीय न्याय व्यवस्था केंद्रीभूत ठेवून व भारतीय संस्कृती आधारभूत ठेवून संघटना काम करत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत देण्यासाठी ॲडव्होकेट वेल्फेअर फंड काढावा, प्रत्येक न्यायालय ठिकाणी संघटना शाखा स्थापन करण्यात येत असल्याचे सांगितले. कोकण प्रांत सरचिटणीस आनंद नायक यांनी सांगितले, विद्यार्थ्यांसाठी स्टडी सर्कल, न्याय केंद्र सुरू केले आहे. गैर प्रवृत्ती, अनिष्ट गोष्टी, महिला अत्याचाराच्या प्रकरणी अधिवक्ता म्हणून काय करावे, याचा चौकसपणे केला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला निधन झालेल्या सहकारी वकिलांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन ॲड. संदेश शहाणे यांनी केले. ॲड. श्रीरंग भावे यांनी आभार मानले. स्वरदा लोवलेकर व प्राची बाईंग यांनी पसायदान सादर केले.
बार असोसिएशनतर्फे मदत
महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे सदस्य सुभाष घाटगे यांनी सांगितले की, या क्षेत्रात आलेल्या नव्या वकिलांना बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्रॅम सुरू केला आहे. ८ दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. कोविड काळात ३ कोटी ३६ लाख रुपये खर्चून वकिलांना जिन्नस साहित्य दिले. बॅंक ऑफ इंडियाशी संपर्क साधून वकिलांना ८.८५ टक्के टक्के व्याजाची योजना मंजूर करून घेतली. आतापर्यंत सुमारे अडीच हजार जणांनी कर्ज घेतले आहे. गृह, कार्यालय नूतनीकरणासाठी ६.३५ टक्के दराची नवी कर्जयोजना लवकरच मंजूर होईल. कोरोनामध्ये तत्काळ ५० हजार रुपयांची मदत वकिलांना दिली आहे. गेल्यावर्षी कोरोना व अन्य आजाराचे ४९३ व या वर्षी १३० जणांना ६१ लाख रुपयांची मदत दिली आहे. मृत्यू पावलेल्या १६ जणांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले. या व्यतिरिक्त आणखी दीड लाख रुपये देण्याचा विचार आहे. कोविड रिलीफ फंड खाते काढले आहे.