ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित, सदस्यांनी केला निषेध
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेतमध्ये कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी ग्राम कृती दलाने बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीकडे सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. हे वर्तन बेजबाबदारपणाचे असल्याचा आरोप करत सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कृतीचा उपस्थित ग्रामस्थांनी निषेध केला आहे.
Corona is spreading rapidly in Palshet, Taluka Guhagar. The Gram Kruti Dal had called a meeting to discuss the matter. However, the Sarpanch and Gramvikas Adhikari ignored this meeting. Therefore the 20 villagers who are came for meeting condemned the action of the Sarpanch and Gramvikas Adhikari, alleging that the behavior was irresponsible.
पालशेत गावात जुलै 2021मध्ये कोरोनाची साथ वेगाने पसरु लागली आहे. दुसऱ्या लाटेत पालशेत गावात 156 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील सर्वाधिक 84 रुग्ण संख्या जुलै महिन्यातील आहे. तर ऑगस्ट महिन्यात 6 रुग्ण सापडले आहेत. गावातील दोन वाड्या शासनाने कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर केल्या आहेत. या पार्श्र्वभुमीवर ग्राम कृती दलाच्या सदस्यांनी कृती दलाची सभा आयोजीत करावी. अशी विनंती पालशेतचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना केली. मात्र सदरची विनंती सरपंचांनी धुडकावून लावली. तसेच मागील 3 महिन्यांमध्ये कोणतीही सभा आयोजीत केली नाही. त्यामुळे काही ग्रामस्थांनी एकत्र येत आरोग्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोरोना साथ रोग नियंत्रणासाठी तातडीने 5 ऑगस्टला बैठक घेण्याचा निर्णय घेतला. या बैठकीचे निमंत्रण व्हॉटसॲपद्वारे सरपंचांना कळवले. ग्रामविकास अधिकारी यांचेजवळ रवींद्र कानिटकर यांनी बैठकीबाबत बोलणे केले.
5 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता उपसरपंच, 1 ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह 18 ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते. सायंकाळी 5.15 पर्यंत सरपंच आले नाहीत म्हणून त्याच्या घरी एका व्यक्तीकरवी निरोप पाठविण्यात आला. ग्रामविकास अधिकाऱ्यांना थेट गटविकास अधिकाऱ्यांनी निरोप दिला. तरीदेखील सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी सभेसाठी ग्रामपंचायतीत आले नाहीत. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी दोघांचाही निषेध केला आहे. याबाबतचे पत्र सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना लिहिण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी विनंती गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या सभेला उपसरपंच महेश वेल्हाळ, ग्रामपंचायत सदस्या सौ. मधुरा नागे यांच्यासह दिलीप नार्वेकर, यशवंत पालकर, शरद पाटील, सिताराम पटेल, विकास दाभोळकर, चंद्रहास चव्हाण, दत्तराज पाटील, अंकुल बोटके, महेश तोडणकर, अशोक चव्हाण, धनंजय बिर्जे, विनायक गुहागरकर, वैभव काळे, अंकुश पाडावे, प्रवीण पाडावे, गणेश पाडावे, सचिन तांबे, दिनेश घाणेकर आणि रवींद्र कानिटकर उपस्थित होते.