गुहागर, ता. 11 : गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील जिल्हा परिषद शाळा जांगळवाडी येथे सोमवार 12 जुलै रोजी कोविशिल्डचे लसीकरण होणार आहे. अशी माहिती या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता समिती सभापती अमोल गोयथळे यांनी दिली.
गुहागर नगरपंचायतीने प्रभाग निहाय लसीकरणाला सुरवात केली आहे. गुरुवारी 8 जुलैला प्रभाग 17 मध्ये घेतलेले लसीकरण यशस्वी झाले. नागरिकांनी देखील प्रभाग निहाय लसीकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे सोमवारी होणारे लसीकरण देखील प्रभाग निहाय करण्यात येणार आहे.
गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग 16 मध्ये खालचापाट भंडारवाडा मधील काही भाग, भाटीआळी आणि लोखंडे विभागातील काही भाग येतो. या प्रभागात रहाणाऱ्या 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना कोविशिल्डचा पहिला डोस सोमवारी, 12 जुलैला देण्यात येणार आहे. तसेच कोविशिल्डचा पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झाले आहेत अशा गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
जांगळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण केंद्र आहे. सोमवारी 12 जुलैला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे. सकाळी 8.30 वा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे टोकन देण्यास सुरवात होईल. अशी माहिती सभापती अमोल गोयथळे यांनी दिली आहे.