७५० शेतकऱ्यांना संघटित करत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
गुहागर, ता. 28 : गुहागर ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. मंदार राजाराम जोशी यांची ‘महाकृषी गौरव पुरस्कार २०२६’ अंतर्गत उत्कृष्ट सेंद्रिय काजू उत्पादन व शेतकरी उत्पादक कंपनी विकास गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी पुणे येथे होणाऱ्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. Mandar Joshi awarded ‘Mahakrishi Gaurav Award’
गुहागर ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तब्बल ७५० सभासद शेतकऱ्यांना एकत्र आणत स्थानिक काजू उत्पादन, काजू व्यापार, काजू प्रमाणीकरण, कृषी सेवा केंद्र तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून ब्रँडिंग आणि मार्केटिंग असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीच्या विकासाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मंदार जोशी यांनी केले आहे. Mandar Joshi awarded ‘Mahakrishi Gaurav Award’
शेतकऱ्यांना केवळ शेतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांना संघटित करणे, त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक कृषी उत्पादनांना स्वतंत्र ओळख निर्माण करून देणे, या उद्देशाने त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मंदार जोशी यांना मिळणारा हा सन्मान केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण गुहागर तालुक्यासह कोकणातील शेतकरी बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्यामुळे तालुक्यातील तरुणांना शेती, कृषी उद्योग आणि सहकार क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्याची प्रेरणा मिळणार आहे. Mandar Joshi awarded ‘Mahakrishi Gaurav Award’
या निवडीबद्दल मंदार जोशी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही शेतकरी, महिला बचत गट आणि कोकणच्या कृषी विकासासाठी त्यांच्या हातून असेच भरीव कार्य घडावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. Mandar Joshi awarded ‘Mahakrishi Gaurav Award’
