कला, क्रीडा, साहस, साहित्य अन् सर्जनशीलतेची विद्यार्थ्यांना मिळणार पर्वणी
गुहागर, ता. 26 : : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी, शिक्षणाला अनुभवांची जोड देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पीएमश्री आदर्श शाळा वेळणेश्वर नं. १ येथे पीएमश्री नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सहा दिवसीय ‘हिवाळी शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. Winter camp begins at Velneshwar
गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर ते मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिराचा उद्घाटन सोहळा आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ नेत्राताई ठाकूर, पंचायत समिती सदस्य संदीप गोरीवले यांच्या शुभहस्ते गुहागर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे, शिक्षणविस्तार अधिकारी महेंद्र वळवी, केंद्र समन्वयक ज्ञानेश्वर वाघमारे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. Winter camp begins at Velneshwar
शिबिराच्या पहिल्या दिवशी संविधान दिनानिमित्त शिबिराचे उद्घाटन, गायन व वादन मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यासाठी ज्येष्ठ गायक व साहित्यिक मा. श्री. राष्ट्रपाल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. दुसऱ्या सत्रात कथाकथन व सृजनात्मक लेखन हा उपक्रम होणार असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वरजी झगडे मार्गदर्शन करणार आहेत. Winter camp begins at Velneshwar
शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी चित्रकला व रेखाचित्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून कलाविश्व आर्ट स्टुडिओचे संस्थापक मा. श्री. सर्वेश दाभोळकर मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात कलारत्न अकादमी, चिपळूणचे मा. श्री. रुपेश घाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य कार्यशाळा होणार आहे.
शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा तसेच अभिनय मार्गदर्शन होणार असून ज्येष्ठ सिनेअभिनेते मा. श्री. विवेकानंद जोशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी कॅम्पिंग व सर्व्हायव्हल स्किल्स हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (LT), रत्नागिरी भारत स्काऊट्स अँड गाईड्सचे मा. श्री. डॉ. मंगेश हटकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना शिवकालीन साहसी खेळांचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हा मर्दानी खेळ असोसिएशनचे संस्थापक मा. श्री. चिन्मय सुधीर गुरव मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रात हस्तकला व ई-वेस्ट अपसायकलिंग प्रोजेक्ट्स हा पर्यावरणपूरक उपक्रम होणार असून जीवन शिक्षण, गुहागर नं. १ चे पदवीधर शिक्षक मा. श्री. राजू सुर्वे मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप होणार आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची कल्पकता, कलात्मकता, कौशल्ये आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडणार आहे. Winter camp begins at Velneshwar
पीएमश्री उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आनंददायी, अनुभवाधारित व कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळावे, या उद्देशानेच सदर शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती पीएमश्री नोडल टीचर श्री बाबासाहेब राशिनकर सर यांनी दिली. मुख्याध्यापक सतीश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले असून पदवीधर शिक्षिका शैलजा साळे, बिपिन विचारे, पीएमश्री नोडल टीचर उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, उपशिक्षिका सुलक्षणा करडे-राशिनकर, भारती गोवेकर-वावरे, शिक्षण सेविका प्रियंका पवार, तेजस्विनी जगताप तसेच अतुल वसावे यांच्यासह आकांक्षा खरे साक्षी खरे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उपाध्यक्ष वैभव ठाकूर, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष विश्वजीत जामसुतकर व सर्व सदस्यांचे पालक व ग्रामस्थ बंधु भगिनींचे या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे. Winter camp begins at Velneshwar