गुहागर पोलिस ठाण्याकडून राबवला जाणार नावीन्यपूर्ण उपक्रम
गुहागर, ता. 09 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून पुढे येत असलेल्या गुहागरमध्ये वर्षभर हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. गुहागर चौपाटीवर समुद्रात पर्यटनाचा आनंद घेत असताना समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी आता ‘रोबोटीक वॉटर क्राफ्ट’ची विशेष मदत होणार आहे. गुहागर पोलिस ठाण्याकडून हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. Robotic watercraft at Guhagar beach
गुहागर समुद्रात रोबोटीक वॉटर क्राफ्ट मशीनच्या सहाय्याने गुहागर पोलिस ठाण्याकडून पोलिस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक सराव घेण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते. हा रोबोटीक वॉटर क्राफ्ट समुद्राच्या २०० मीटर अंतरापर्यंत सहजगत्या जाऊ शकतो. तसेच समुद्राच्या उसळणाऱ्या मोठ्या लाटांचा सामना करून सहजगत्या समुद्राच्या खोल पाण्यात बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर घेऊन येऊ शकतो. रोबोटीक वॉटर क्राफ्ट दाखल झाल्याने समुद्रकिनाऱच्या दुर्घटनांना आळा बसणार आहे. Robotic watercraft at Guhagar beach
जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे गुहागर पोलिस ठाण्याला एक रोबोटीक वॉटर क्राफ्ट प्राप्त झाले आहे. गणपतीपुळे व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर व आरे वारे या समुद्रकिनाऱ्यावर प्रत्येकी एक, तर गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर दोन रोबोटीक वॉटर क्राफ्ट देण्यात आले आहेत. Robotic watercraft at Guhagar beach
पुणे, मुंबई व घाट माथ्यावरून येणाऱ्या पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याचे विशेष आकर्षण असते. सात किलोमीटर लांबीचा स्वच्छ सुंदर समुद्र किनारा, येथील श्री देव व्याडेश्वर आणि दुर्गादेवी हि देवस्थाने अनेकांचे कुलदैवत असल्याने वर्षातील बाराही महिने पर्यटकांची मोठी गर्दी असते. गुहागरच्या समुद्र स्नानासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. परंतु खोल समुद्रात जाऊन समुद्र स्नानाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना अनेक वेळा समुद्रात बुडताना बाहेर पडणे कठीण होते. यासाठी त्यांच्या सुरक्षितेसाठी गुहागर नगरपंचायतीकडून किनारपट्टीला जीवरक्षक नेमण्यात आले आहेत. आता त्यांच्या जोडीला रोबोटीक वॉटर क्राफ्ट या मशीनचा वापर आता केला जाणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर एखादी दुर्घटना घडत असल्यास तत्काळ यंत्रणा तत्पर असावी या उद्देशाने गुहागर पोलिस ठाण्याकडून होमगार्ड व पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना रोबोटीक वॉटर क्राफ्टशी संबंधित यंत्रणेकडून खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. Robotic watercraft at Guhagar beach
गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील प्रात्यक्षिक दरम्यान पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे, पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, उदय मोनये, भावेश रोहिलकर, किशोर साळवी, अनिकेत चव्हाण, कुमार घोसाळकर व होमगार्ड उपस्थित होते. Robotic watercraft at Guhagar beach
