तीन दशकांचा कलाप्रवास; १० नोव्हेंबरला महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम
गुहागर, ता. 31 : ग्रामीण भागातील कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने तळवली गावचे सुपुत्र रविंद्र रोहिणी अनंत पवार गेली तीन दशके कला, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनय, निवेदन, सूत्रसंचालन, मराठी दूरचित्रवाणी मालिकांचे निर्मिती व्यवस्थापन आणि सामाजिक प्रबोधनाचा अनुभव घेतल्यानंतर आता त्यांनी गुहागर तालुक्यातील कलाकारांना एकत्र आणण्यासाठी गुहागर तालुका कला मंचाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. Ravindra Pawar’s initiative for the artists of Guhagar
संस्कारवर्गापासून कलाक्षेत्रापर्यंतचा प्रवास
१९९६ मध्ये आपल्या वाडीतील लहान मुलांसाठी संस्कारवर्ग सुरू करून पवार यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. १९९९ मध्ये इलेक्ट्रिशियनचे आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत नोकरी व व्यवसाय सांभाळत त्यांनी अभिनय आणि निवेदनाच्या क्षेत्रात वाटचाल सुरू ठेवली. ‘सरनोबत’ या ऐतिहासिक नाटकातून अभिनयाचा अनुभव घेत त्यांनी पुढे नाट्यशिबिरे, एकांकिका, पथनाट्ये आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. Ravindra Pawar’s initiative for the artists of Guhagar
विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन
२०००–२००१ मध्ये ‘परिवर्तन संचालित स्मरणशक्ती व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळे’च्या माध्यमातून त्यांनी गुहागर व चिपळूण तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये विनामूल्य मार्गदर्शन केले. जवळपास ७० व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढविण्याच्या पद्धती, अभ्यासातील सोपे मार्ग आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
मराठी मालिकांच्या निर्मिती व्यवस्थापनाचा अनुभव
निवेदक व कलाकार म्हणून काम करताना त्यांनी निर्मिती व्यवस्थापन क्षेत्रातही स्वतःची ओळख निर्माण केली. ‘वहिनीसाहेब’, ‘देवयानी’, ‘लागिरं झालं जी’, ‘मिसेस मुख्यमंत्री’, ‘संभाजी’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘ठरलं तर मग’ आणि ‘शिवा’ यांसह विविध मराठी मालिकांच्या निर्मिती व्यवस्थापनाशी त्यांचा संबंध राहिला आहे. या अनुभवातून मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि पडद्यामागील कर्मचाऱ्यांच्या कामाचे महत्त्व त्यांनी जवळून जाणले.
गुहागर तालुका कला मंचाची स्थापना
ग्रामीण भागातील कलाकारांना संधी, मार्गदर्शन आणि व्यावसायिक व्यासपीठ मिळावे, या ध्येयाने ११ एप्रिल २०१८ रोजी गुहागर तालुका कला मंचाची स्थापना करण्यात आली. गायक, वादक, अभिनेते, नर्तक, लेखक, निवेदक आणि तांत्रिक क्षेत्रातील कलावंतांना एकत्र आणून त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे, हा या मंचाचा प्रमुख उद्देश आहे. ‘ग्रामीण कलेला व्यासपीठ, कलावंतांना संधी आणि कलेतून रोजगार’ या संकल्पनेतून तालुक्यात व्यापक सांस्कृतिक चळवळ उभी करण्याचा त्यांचा मानस आहे. Ravindra Pawar’s initiative for the artists of Guhagar
१० नोव्हेंबरला महिलांसाठी विशेष मनोरंजन कार्यक्रम
पारमी प्रॉडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेळ पैठणीचा… सन्मान होम मिनिस्टरचा!’ हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृह, पाटपन्हाळे (शृंगारतळी), ता. गुहागर येथे आयोजित करण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील महिलांना मनोरंजनाची संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि सामाजिक संवादातून आनंददायी वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. कार्यक्रमात महिला, सासू-सुना आणि जोडीदारांसाठी सहभागाची संधी असून प्रवेश विनामूल्य आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या १०० महिलांना सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. विजेत्यांसाठी मानाची पैठणी आणि अन्य आकर्षक बक्षिसांचे नियोजन करण्यात आले आहे.
स्थानिक कलाकारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न
गुहागर तालुक्यात कला-सांस्कृतिक केंद्र उभारावे तसेच पालशेत–तवसाळ परिसरातील प्रस्तावित चित्रनगरीमध्ये स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, व्यावसायिक आणि युवकांना रोजगार, प्रशिक्षण व कामाच्या संधींमध्ये प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा रविंद्र पवार यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या मते, ग्रामीण भागात प्रतिभेची कमतरता नाही; गरज आहे ती योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि संधींची. स्वतःच्या तीन दशकांच्या अनुभवाचा उपयोग स्थानिक कलाकारांच्या प्रगतीसाठी व्हावा, या हेतूने गुहागर तालुका कला मंचाच्या माध्यमातून पुढील सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. Ravindra Pawar’s initiative for the artists of Guhagar
कार्यक्रमासाठी संपर्क व नोंदणी : दिपाली रविंद्र पवार — ९५९४६२०९९२.
