सरासरी १.२३ मीटरने घट, १८३ गावांमध्ये टंचाईचा धोका
भूजल सर्वेक्षण अन् विकास यंत्रणेचा अंदाज; उपशावर निर्बंध
रत्नागिरी, ता. 17 : जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पडलेल्या पावसात जवळपास २० टक्के घट झाली आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील भूजल पातळीवर झाला आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत चालू वर्षी भूजल पातळीत सरासरी १.२३ मीटरने घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे आगामी ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १८३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने व्यक्त केला आहे. Decline in groundwater levels
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रत्नागिरीच्या अहवालानुसार, जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ३३९५.०९ मिमी पाऊस पडतो; मात्र यावर्षी केवळ २६९९.५३ मिमी. (१९.८१ टक्के घट) पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर, राजापूर, रत्नागिरी आणि दापोली या तालुक्यांमध्ये पावसाची घट सर्वाधिक आहे. पावसाच्या या तुटीमुळे जिल्ह्यातील ६३ निरीक्षण विहिरींच्या नोंदीनुसार भूजल पातळीत सरासरी १.२३ मीटरने घट झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २.९६ मीटरने भूजल पातळी खाली गेली असून, राजापूर (१.४७ मी.), गुहागर (१.४१ मी.), लांजा (१.१७ मी.) आणि चिपळूण (१.०१ मी.) या तालुक्यांतही परिस्थिती गंभीर आहे. Decline in groundwater levels
व्यावसायिक व अतिउपशावर प्रशासकीय देखरेख ठेवण्यात येईल. उपलब्ध पाण्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी शोषखड्डे, शेततळी, वनराई बंधारे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मोहीम राबवण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाची घट आणि भूजल पातळीतील घसरण चिंताजनक आहे. टंचाईकाळात ग्रामस्थांना भीषण समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी आतापासूनच पाण्याचा संयमित वापर आणि पुनर्भरणाचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. – एस. एस. गोंधळी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रत्नागिरी Decline in groundwater levels
