गुहागर नगरपंचायत : गर्दी टाळण्यासांठी प्रभागनिहाय नियोजन
गुहागर, ता. 07 : शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गुरुवारी लसीकरण होणार आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. 1 येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी गुहागर नगरपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने नगरपंचायत क्षेत्रातील उर्वरित प्रभागामध्ये स्वतंत्रपणे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती आरोग्य व स्वच्छता समिती सभापती श्री. अमोल गोयथळे यांनी दिली.
गुहागर नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने सुरुवातीला नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग 1 ते 17 पैकी काही ठराविकच प्रभागात लसीकरण करण्यात आले होते. मात्र, काही दिवसानंतर पुन्हा जीवन शिक्षण शाळा क्र १ मध्ये लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू करण्यात आले. सोमवार दि. 5 जुलैला या लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासूनच नागरिकांनी रांग लावली. सोमवारी सकाळी ही रांग किर्तनावाडी रस्त्यावरील नारायण मंदिरापर्यंत पोचली होती. लसीकरणासाठी झालेली गर्दी आणि मध्यरात्री पासुन रांगेत उभे रहाण्यासाठी नागरिक घेत असलेले कष्ट पाहून नगरपंचायतीने तातडीने नगरसेवकांची सभा बोलावली. या सभेमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी पुन्हा एकदा प्रभागनिहाय लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाप्रमाणे गुरूवार, दि. 8 जुलै रोजीपासून होणारे शहरातील लसीकरण प्रभागनिहाय होणार आहे. गुरूवार, दि. 8 जुलै रोजी केवळ प्रभाग क्र. 17 मधील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घ्यायचा आहे अशा प्रभाग क्र. 17 मधील १८ ते ६० वयोगटातील नागरिकांनी हा लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांनी केले आहे.