वाणिज्य मंडळाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना उद्योजकतेची प्रेरणा
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे यावर्षीच्या वाणिज्य मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा यशस्वी महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. Women entrepreneurs honored at Patpanhale College

सत्कारमूर्तींमध्ये सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या श्रीमती वसुधा जोग (जोग आजी), मीरा गाडगीळ (गुहागर), अनुजा देव (वेळंब), योगिता सोमण (तळवली), नम्रता भेकरे आणि स्नेहा भेकरे (कोतळूक) यांचा समावेश होता. गुहागर तालुक्याच्या आर्थिक विकासात दिलेल्या योगदानाबद्दल तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. Women entrepreneurs honored at Patpanhale College

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. देसाई यांनी मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातही व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. मुंबईकडे धाव घेण्यापेक्षा गुहागर तालुक्यात राहून स्थानिक संसाधनांच्या आधारे यशस्वी उद्योग उभारता येतात आणि रोजगारनिर्मिती करता येते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमात वसुधा जोग, मीरा गाडगीळ, अनुजा देव आणि स्नेहा भेकरे यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव, आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करत मिळवलेले यश विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या प्रेरणादायी मनोगतामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेबाबत नवी दिशा मिळाली. Women entrepreneurs honored at Patpanhale College

याच कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षपदी कु. जान्हवी विचारे यांची निवड करण्यात आली. नव्याने निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवर उद्योजिकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. सुभाष घडशी, प्रा. कांचन कदम, त्रिशला साबळे, ग्रंथपाल धनंजय गुरव तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. कांचन कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन व समारोप कु. प्रणया गावडे यांनी केला. Women entrepreneurs honored at Patpanhale College
