उत्तम व्यवसाय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप
गुहागर, ता. 29 : गुहागर आगारातील अधिकाऱ्याने एस.टी.च्या मालवहातुकीच्या व्यवहारात 5 लाखाचा भ्रष्टाचार केल्याची चर्चा सध्या रत्नागिरी विभागात सुरु आहे. मात्र या चर्चेत कोणतेही तथ्य नसुन माल वहातुक व्यवहारात कोणतीही अफरातफर झालेली नाही. कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने 1 लाख 85 हजार रुपयांची येणेबाकी दिसत आहे. अशी माहिती गुहागरचे आगारप्रमुख वैभव कांबळे यांनी दिली आहे.
The S.T. Transport officer from Guhagar depot has embezzled Rs 5 lakh from Transport Busineess. This rumor currently spread in Ratnagiri division. However, there is no fact in this rumor and no fraud has taken place in the freight transaction. 1 lakh 85 thousand is due, due to non-fulfillment of documents. This information has been given by Vaibhav Kamble, Depot Manger of Guhagar.
काय आहेत आरोप
गुहागर आगारातून होणाऱ्या मालवहातुकीमध्ये 5 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित अधिकाऱ्याने यामधील 3 लाख रुपयांचा भरणा एस.टी. महामंडळात केला आहे. या अधिकाऱ्याकडून उर्वरित रक्कम न आल्याने त्याचा पगार थांबविण्यात आला आहे. अशी चर्चा सध्या रत्नागिरी जिल्ह्यात विशेषत: रत्नागिरीत सुरु आहे.
गुहागर आगार द्वितीय क्रमांकावर
प्रवासी वहातूक बंद झाल्यावर उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एस.टी.ने माल वहातूकीला प्राधान्य दिले. विभाग स्तरावरील अधिकाऱ्यांनी एमआयडीसीतील कंपन्या, मोठे उद्योजक यांना भेटून तेथील आगाराला व्यवसाय मिळवून दिला. गुहागरमध्ये आरजीपीपीएल ही एकमात्र कंपनी सोडली तर माल वहातूक करता येईल असा अन्य कोणता उद्योग नव्हता. तरीही रविंद्र पवार यांनी आगारातील चालक वाहक तसेच अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी या सर्वांना सोबत घेवून व्यवसाय मिळेल अशा शक्यता शोधुन काढल्या. आंबा बागायतदारांपासून किराणा मालाच्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या. त्यातूनच चिरे वहातूकीची संधी मिळाली. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की गुहागरमधील जांभा चिर्ऱ्याला एस.टी.च्या मालवहातुकीमुळे पश्चिम महाराष्ट्रातून मागणी वाढली. चिऱ्यासोबत काजुची टरफले, नारळाची सोडणे यांची देखील वहातूक गुहागर आगारातून झाली. अनपेक्षितरित्या गुहागर आगार माल वहातुकीमध्ये विभागात दुसऱ्या क्रमांकावर आले.
खेकडा प्रवृत्तीला यश बघवले नाही
एस. टी. परिवारीतील खेकडा प्रवृत्तीच्या लोकांना गुहागर आगाराचे हे यश पहावले नाही. त्यांनी गुहागर आगाराची बदनामी करण्यासाठी स्थानक प्रमुख पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आरोप करण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांनी माल वहातुकीतील व्यवहार कसा होतो याची साधी माहिती देखील घेतली नाही. एस.टी.मधील व्यक्तिगत वादांमुळे स्थानक प्रमुख पवारांवर नाराज असलेल्या काही मंडळींनी या आरोपांना खतपाणी सुरुवातीला केवळ भ्रष्टाचाराचा आरोप होता. मग त्यात 5 लाखाचा भ्रष्टाचार असा आरोप झाला. मग त्याला तीन लाख रुपये भरल्याची, पगार थांबवल्याची फोडणी दिली गेली. दोन संघटनांमधील असुयेमधुन आरोप पसरवले गेले.
याचा प्रत्यय गुहागर आगारातही पहायला मिळाला. आरोप झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी संघटना उभी रहाणार का असा प्रश्र्न विचारला असता जे आमच्या पाठीशी रहात नाहीत त्याच्या पाठीशी संघटना म्हणून का उभे रहायचे असा प्रतिप्रश्र्न विचारला गेला.
आगार व्यवस्थापकांनी आरोप फेटाळले
या संदर्भात बोलताना गुहागरचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे म्हणाले की, गुहागर आगारातील सर्वांनीच माल वहातुकीतून एस.टी.चा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच कोणतेही औद्योगिक क्षेत्र नसताना जिल्ह्यात तीन क्रमांकाचा व्यवसाय गुहागर आगाराने केला. चिऱ्याची वहातूकही एस.टी. यशस्वीरित्या करु शकते हे गुहागर आगाराने दाखवून दिले आहे. नोव्हेंबर 2020 पासून मे 2021 पर्यंत 20 लाख 74 हजार 260 रुपयांचे उत्पन्न आम्ही मिळवले आहे. त्यापैकी 1 लाख 85 हजार 330 रुपये येणे बाकी आहे. यापैकी अधिकतर रक्कम ही रत्नागिरी आगारासह कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग विभागातील आगारांकडे जमा आहे. मात्र पोचपावती व अन्य कागदपत्र गुहागर आगाराकडे जमा न झाल्याने कागदोपत्री ही रक्कम थकित असल्याचे दिसते. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. कारवाई झालेली नाही. 30 जूनपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण करण्याच्या सूचना महामंडळानेच राज्यातील सर्व आगारांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे आमचे कर्मचारी कार्यवाही करत आहेत.
परिणाम
या आरोपांमुळे गुहागर आगारातील माल वहातुकीशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व्यथीत झाले आहेत. माल वहातूकीचा व्यवसायच नको. उगाच श्रम करुन खोटे आरोप हवेत कशाला अशा मनस्थितीत गुहागर आगारातील कर्मचारी आले आहेत.
सुरवातीला माल वहातुकीची जबाबदारी घेणाऱ्या गुहागर आगारामधील वहातूक नियंत्रक रवींद्र पवार यांनी या आरोपांचा धसका घेतला आहे. अधिकाराचे पद आले की जबाबदाऱ्या वाढतात. चांगले काम केल्यानंतरही भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. त्यामुळे आपली पदावनति करा. अशी विनंती ते अधिकाऱ्यांकडे करत आहेत.