आमदार जठार व निलेश सुर्वेंचे प्रयत्न : 3 जूनला बैठक
गुहागर, ता. 29 : राज्य संरक्षित स्मारक अशी नोंद होवूनही गोपाळगड किल्ल्याच्या सातबाऱ्यांवर काही व्यक्तींची नावे लिहिली गेली. त्यानंतर संबधित खातेदारांनी पर्यटकांना आम्हीच गडाचे मालक असल्याचे सांगितल्याने वाद निर्माण झाला. याबाबत लक्ष घालून गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात घ्यावा. अशी विनंती गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी आमदार प्रमोद जठार यांना केली. त्याची दखल घेत 3 जूनला आमदार जठार यांनी जिल्हाधिकाऱी रत्नागिरी यांच्यासह पुरातत्व विभाग अधिकारी यांची बैठक निश्चित केली आहे. Dispute over ownership of Gopalgad again
मे महिन्यात गुहागरात येणारे अनेक पर्यटक गोपाळगड या किल्ल्याला भेट देतात. बदलापुरचे सागर पवार आणि कुटुंब 26 मे रोजी गोपाळगड किल्ल्यावर गेले. किल्ला पहाताना त्यांनी आमराईत जमिनीवर पडलेले आंबे उचलले. त्यावेळी या पर्यटकांना एका स्थानिकाने हटकले. हा गड आमच्या मालकीचा आहे असे सांगितले. या संदर्भातील व्हिडिओ प्रसारमाध्यमांतून व्हायरल झाला आणि गोपाळगडप्रेमी संतप्त झाले.

गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांच्यापर्यंत हा विषय पोचला. त्यांनी तातडीने या विषयाची माहिती आमदार प्रमोद जठार यांना दिली. त्यांना लिहिलेल्या पत्रात सुर्वे म्हणतात की, राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या गोपाळगडाच्या सातबाऱ्यावर काही तांत्रिक चुकांमुळे स्थानिक रहिवाशांचे नाव दाखल झालेले आहे. Dispute over ownership of Gopalgad again
गेली अनेक वर्ष सदरची मालकी हटविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी मंडळी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक वृत्तपत्रे शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. याबाबतच्या कायदेशीर बाबी बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या असून आता पुरातत्व विभाग व महसुल विभाग यांनी अंतिम टप्प्यातील कार्यवाही करुन किल्ला शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. तरी आपण शासनाकडे पाठपुरावा करुन राज्य संरक्षित स्मारक असणारा गोपाळ गड खाजगी मालकीतून, वहिवाटीतून मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
28 मे रोजी निलेश सुर्वे यांनी आमदार प्रमोद जठार यांना पत्र दिले. त्याची तातडीने दखल घेत आमदार जठार यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पत्र लिहून पाठपुरावा सुरू केला. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी देखील या विषयातील गांभिर्य लक्षात घेतले आहे. 3 जून रोजी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी वहाने साहेब आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांची गोपाळगड या विषयात बैठक होणार आहे. त्यामुळे गोपाळगडावरील उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल असा विश्र्वास निलेश सुर्वे यांनी व्यक्त केला आहे. Dispute over ownership of Gopalgad again
