Guhagar News : भारतातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे आणि ज्याचे सरासरी वय अवघ्या २९ वर्षाच्या आसपास आहे.ही तरूणाई देशाची सर्वांत मोठी ताकद मानली जाते. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन,कला आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात भारतीय तरूणांनी आपली मुद्रा उमटवली आहे. मात्र, वाढती स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, सोशल मीडियाचा प्रभाव आणि गुणांच्या दबावामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाच्या गर्तेत जात आहेत.आज शिक्षण ज्ञानापेक्षा गुणांच्या शर्यतीत अडकले असून, संवादाचा अभाव विद्यार्थ्यांना अधिक एकटे करत आहे. परिणामी देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण ही राष्ट्रीय चिंतेची बाब बनली आहे. Youth is the great strength of the country
‘एनसीआरबी’ ने अर्थात ‘राष्ट्रीय गुन्हे अभिलेख’ विभागाने ‘अपघाती मृत्यू आणि आत्महत्या-२०२४ च्या प्रसिद्ध केलेल्या अहवालातील आकडेवारी अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. हा अहवाल आपल्या शिक्षण पद्धतीवर आणि सामाजिक ढाच्यावर गंभीर प्रश्र्नचिंन्ह उपस्थित करणारा आहे. २०२० सालापासूनचा कल पाहीला, तर विद्यार्थ्यांच्या हत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. २०२० मध्ये १२,५५६ विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली होती, तर २०२४ पर्यंत हा आकडा १४,४८८ वर पोहोचला आहे. देशात होणार्या एकूण आत्महत्त्यांमध्ये विद्यार्थ्यांचा वाटा ८.५ टक्क्यांच्या आसपास आहे. विशेषतः महाराष्ट्राची स्थिती अतिशय भयावह आहे, कारण देशात विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या (१९०९)याच राज्यात नोंदवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो. देशांतील एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी सुमारे ४३ टक्के घटना केवळ या चार राज्यांतच घडत आहेत, हे भीषण वास्तव नाकारून चालणार नाही. अलीकडेच दहावी- बारावीच्या निकालांचे हंगाम पार पडले. अकोला जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांला ६७ टक्के गुण मिळूनही त्याने केवळ अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. या घटनेमुळे आपण यशाची व्याख्या केवळ गुणांच्या आणि टक्केवारीच्या तराजूत मोजायला लागलो आहोत. Youth is the great strength of the country
आजची शिक्षण व्यवस्था ही खर्या अर्थांने ज्ञानप्राप्तीचे केंद्र न राहता ‘ स्पर्धेंचा आखाडा ‘बनली आहे. पालकांमधील वाढती महत्त्वाकांक्षा आणि मुलांवर लहानपणापासून लादला जाणारा अभ्यासाचा बोजा यामुळे विद्यार्थ्यांचे बालपण हरवत चालले आहे. नर्सरीपासून सुरू झालेले शाळा, क्लास, विशेष कोर्सेस आणि स्पर्धा परीक्षांचे चक्र विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीनिवडी विसरायला लावते. या चक्रातून मुले कधी बाहेर पडू शकत नाहीत आणि मग गुणांची जीवघेणी शर्यत सुरू होते. Youth is the great strength of the country
समाजात केवळ डाॅक्टर किंवा इंजिनीअर होणे म्हणजेच आयुष्य सार्थकी लावणे, असा एक चुकीचा नॅरेटिव्ह रूजला आहे. वास्तविक, इतिहास, भूगोल, अर्थशास्र, कला आणि साहित्यासारखा विषयांतही करियरच्या अफाट संधी उपलब्ध आहेत आणि देशाच्या विकासात या विषयातील तज्ज्ञांचे योगदान मोलाचे आहे. मात्र, या क्षेत्रांना कमी लेखले जात असल्याने विद्यार्थी सतत एकाच दबावाखाली वावरतात. त्यातच सोशल मीडियाच्या आभासी दुनियेने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. सध्याच्या काळात आपण तंत्रज्ञानाने जोडले गेलो आहोत, पण भावनेने मात्र दुरावत चाललो आहोत. भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेला ‘ निकोप संवाद ‘आज दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे कुटुंबात पुन्हा एकदा मनमोकळ्या संवादाचे वातावरण निर्माण करणे अनिवार्य आहे. Youth is the great strength of the country
केवळ गुणांवरून मुलांचे मूल्यमापन न करता, त्यांच्यात असलेल्या कौशल्यांचे कौतुक करायला आपण शिकायला हवे. अपयश हा आयुष्याचा शेवट नसून ती यशाची पहिली पायरी आहे. हा विश्वास विद्यार्थ्यांना देणे ही केवळ पालकांचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. शिक्षण संस्थांनी देखील आता केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर न देता विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. तणाव व्यवस्थापन, अपयश पचविण्याची शक्ती आणि जीवनकौशल्यांचे धडे विद्यार्थ्यांना देणे काळाची गरज आहे. सरकार, शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तरच आपण आपल्या देशाच्या या उद्याच्या आधारस्तंभांना वाचवू शकू. Youth is the great strength of the country
तरूण पिढीमध्ये असलेली ऊर्जा जर विधायक कामात लावायची असेल, तर त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. जर आपण संवादाचे पूल पुन्हा उभारले आणि यशाचे मापदंड बदलले, तरच एन.सी.आर.बी. च्या अहवालातील हे चिंताजनक आकडे भविष्यात शून्यावर येतील.आपल्या तरूण पिढीला केवळ स्पर्धेत धावणारे ‘ यंत्र ‘ न बनवता, त्यांना संवेदनशील आणि कणखर ‘माणूस’म्हणून घडवणे हेच खर्या अर्थाने सुसंस्कृत समाजाचे लक्षण ठरेल. Youth is the great strength of the country
समृद्ध आणि सशक्त भारत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपणे, हीच आजची सर्वात मोठी राष्ट्रभक्ती आहे. केवळ गुण नव्हे, तर जीवन महत्त्वाचे आहे, ही जाणीव समाजाने विद्यार्थ्यांना करून द्यायला हवी. पालक, शिक्षक आणि समाज यांनी संवादाने पूल पुन्हा उभारले, तरच तरूण पिढीला नैराश्यापासून वाचवता येईल. सशक्त भारत घडवायचा असेल, तर आपल्या तरूणाईला मानसिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. Youth is the great strength of the country