इंग्रजी शब्दांना समर्थ मराठी प्रतिशब्दांचा प्रत्यय; श्री. गोळे
गुहागर, ता. 27 : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय येथील मध्यवर्ती ग्रंथालय विभागातर्फे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त “मराठी भाषा गौरव दिन २०२६” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, संस्थेचे सदस्य श्री.जयंत कयाल, प्रमुख अतिथी श्री. नरेंद्र गोळे (भाभा अणुसंशोधन केंद्र येथील माजी अभियंता व ग्रंथ अनुवादक), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार, तसेच जेष्ठ शास्त्रज्ञ समितीचे सदस्य, शिक्षक- शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Marathi Language Pride Day at Velneshwar College
प्रमुख अतिथी श्री. नरेंद्र गोळे यांनी “मराठी भाषेत तांत्रिक शब्दांचा वापर” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दैनंदिन व्यवहारात आपण सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतो; मात्र त्या शब्दांना समर्थ मराठी प्रतिशब्द उपलब्ध असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांनी स्वतः संशोधनपूर्वक अनेक मराठी प्रतिशब्द शोधून काढले असून ते आपल्या ३६ अनुवादित ग्रंथांमधून वापरात आणले आहेत. तसेच हे प्रतिशब्द आपल्या संकेतस्थळावरील ब्लॉगद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून दिल्यास समज अधिक सखोल होते, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. Marathi Language Pride Day at Velneshwar College

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या बोलीवैविध्याचा उल्लेख करताना सांगितले की, बोलींची समृद्ध परंपरा ही मराठीची ताकद आहे; मात्र विज्ञान व तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रमाण मराठीचा सातत्याने वापर होणे आवश्यक आहे. विज्ञानभाषा म्हणून प्रमाण मराठी विकसित झाली, तरच तिची शब्दसंपदा वाढेल आणि भाषा अधिक सक्षम व समृद्ध बनेल, असे त्यांनी प्रतिपादन केले. “ज्ञानभाषा म्हणून मराठी सक्षम करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असा संदेश त्यांनी दिला. Marathi Language Pride Day at Velneshwar College
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागत समारंभाने मंगल वातावरणात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. संतोष चतुर्भूज यांनी प्रभावी शब्दांत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व आणि कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय सहाय्यक दिनेश खेडेकर यांनी नेटक्या, ओघवत्या आणि समर्पक शब्दांत करून कार्यक्रमाला सुसूत्रता व रंगत दिली. सर्वांच्या सहकार्याने व उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. Marathi Language Pride Day at Velneshwar College
