गुहागर, ता. 06 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची सभा दि. ४ जानेवारी २०२६ रोजी तालुक्यातील श्रीमती रखुमाबाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत येथे उत्साहात पार पडली. सभेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाला. District Executive Meeting of COMSAP
या बैठकीस महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, जिल्हा अध्यक्ष श्री. आनंद शेलार, केंद्रीय कार्यवाह श्री. माधव अंकलगे, कोकण मराठी साहित्य परिषद युवा परिषद दक्षिण विभाग अध्यक्ष श्री अरुण मौर्य, केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष श्री आबा पाटील, प्रसिद्ध साहित्यिक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. बाळासाहेब लबडे, साहित्यिक व कोमसापचे तालुका सचिव ईश्वरचंद्र हलगरे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाखांचे तालुकास्तरीय शाखा अध्यक्ष, प्रतिनिधी व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. District Executive Meeting of COMSAP

श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बोलभट सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्ध साहित्यिक डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष श्री. आनंद शेलार यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करून ते सर्वानुमते कायम करण्यात आले. सभेपुढील विषयांच्या पूर्ततेची चर्चा करण्यात आली. सभेपुढील पुढील विषयांमध्ये नवीन वर्षात राबविणार्या उपक्रमांमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद व प्रत्येक तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच यावर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तीन साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत त्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले. सभासद संख्या वाढविण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांवरही सविस्तर चर्चा झाली. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी उपस्थित झालेल्या विषयांमध्ये श्री युयुत्सु आर्ते आणि डॉ. बाळासाहेब लबडे यांनी को.म.सा.प. विकासाच्या दृष्टिकोनातून विचार मांडले. लांजा शाखाध्यक्ष श्री जाधव यांनी शाखा विकासावर कसा भर दिला पाहिजे याविषयी आपले प्रश्न मांडले. District Executive Meeting of COMSAP

समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. प्रदीप ढवळ यांनी कोकण मराठी साहित्य परिषद मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ मिळावे यासाठी परिषदेतर्फे प्रकाशन संस्था सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच कार्यशाळा, चर्चासत्रे, साहित्य संमेलने यांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाच्या विविध मराठी भाषा विषयक उपक्रमांमध्ये परिषद सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. District Executive Meeting of COMSAP
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव श्री. ईश्वरचंद्र हलगरे यांनी केले. या बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा गुहागरचे उपाध्यक्ष मोहन पाटील, सचिव ईश्वरचंद्र हलगरे, सहसचिव डॉ. बाळासाहेब लबडे, सदस्य रजत बेलवलकर व आजीव सभासद योगेश होळंब आदींनी मेहनत घेतली. District Executive Meeting of COMSAP
