महाराष्ट्राच्या सचिन पालकरांची लक्षवेधी कामगिरी
गुहागर, ता. 06 : श्रीनगर, काश्मीर ते कन्याकुमारी येथे १ ते १६ नोव्हेंबर २०२५ रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त, भारत सरकारच्या ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ अंतर्गत एक भव्य आणि ऐतिहासिक सायकल मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली. ‘Dare2Gear’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या ‘काश्मीर ते कन्याकुमारी (K2K) सायकल यात्रा’ मोहिमेत देशभरातील १५० निवडक सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. Bicycle campaign under the ‘Fit India Movement’

ही मोहीम १ नोव्हेंबर २०२५ रोजी श्रीनगर, काश्मीर येथून सुरू झाली आणि अवघ्या १६ दिवसांत कन्याकुमारी येथे संपन्न झाली. या ऐतिहासिक मोहिमेसाठी रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यातील तळघर येथील निवासी सायकलपटू श्री सचिन बाळा पालकर यांची अधिकृत निवड भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ टीममार्फत करण्यात आली होती. जम्मु, दोराह, दिल्ली आणि जयपूर असा प्रवास करत ही सायकल यात्रा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरात येथील नर्मदा तीरावरील भव्य ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue of Unity) येथे पोहोचली. तेथे अभिवादन करून महाराष्ट्रात धुळे, बीड, सोलापूर मार्गे कर्नाटक व तामिळनाडू राज्य ओलांडत ही मोहीम पूर्ण झाली. Bicycle campaign under the ‘Fit India Movement’
त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेला हा सायकल प्रवास केवळ लांब अंतराचा नव्हता, तर तो जिद्द आणि धैर्याचा कसोटीचा क्षण होता. प्रतिकूल हवामान, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि मोठे अंतर यांचा मुकाबला करत सायकलपटूंनी दररोज सरासरी २२५ ते २६० किलोमीटर अंतर कापले. १६ दिवसांच्या या मोहिमेत सचिन पालकरांनी एकूण ४१०० किलोमीटर अंतर आणि जवळपास २०,००० मीटर इलिव्हेशन (Elevation) पार केले. सचिन पालकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यांचे कौतुक होत आहे. तसेच त्यांनी आपले आई-वडील, गुरुजन, आयोजक, मित्रमंडळी आणि आप्तेष्ट यांचे मनःपूर्वक आभार मानले. Bicycle campaign under the ‘Fit India Movement’
