मुंबई, ता. 27 : गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुढील तीन दिवसही या भागांमध्ये अतीजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज 27 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Heavy rain in Konkan coast

पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर असून, किनारी व ग्रामीण भागांमध्ये सतत पावसामुळे नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता आहे. शेतजमिनींत पाणी साचल्याची माहिती आहे. तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. रायगडच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे भूस्खलनाचा धोका कायम आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसासोबत जोरदार वारेही वाहत आहेत. समुद्र खवळलेला असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट तीन सलग दिवस जाहीर असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्यापूर्वी खबरदारी घ्यावी, जलसंकटाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी आणि पावसाचे अपडेट्स सतत घेत राहावे, असे निर्देश हवामान विभागाने दिले आहेत. Heavy rain in Konkan coast