धोपावेतील संसारे कुटुंबाचा आदर्श, 30 हजार दिले समाजकार्यासाठी
गुहागर, ता. 06 : खलाशी म्हणून नोकरी करताना मिळालेले पैसे गेली ५ वर्ष लेकीच्या उपचारांवर खर्च होत होते. त्यातच वर्षभर कोरोना महामारीमुळे आर्थिक गणित बिगडले होते. या पार्श्वभुमीवर एकुलत्या एका मुलीच्या निधनानंतर संसारे कुटुंबाने दुखवटा काढण्याच्या दिवशी मिळालेली सर्व रक्कम समाजकार्यासाठी दान केली. यातून एक नवा आदर्श संसारे कुटुंबाने समाजासमोर ठेवला आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना संसारे कुटुंबाने दाखवलेला मनाचा मोठेपणा अचंबित करणारा आहे.
For the Last 5Years, The Fisherman spent all earned money on his daughter’s treatment. In addition, the Corona epidemic had ruined economic maths throughout the year. Against this backdrop, after the death of their daughter, the Fisherman’s family donated all the money received on the day of grief to social work. From this, a new Model has been set before the society by the family. The magnanimity shown by the Sansare family while the mountain of sorrow has collapsed is astonishing.
गुहागर तालुक्यातील धोपावे गावात संसारे कुटुंब रहाते. या कुटुंबाला मुल नव्हते म्हणून याच गावातील वासुदेव गुडेकर यांची मुलगी पंढरी संसारे यांनी दत्तक घेतली. अत्यंत लाडात स्वप्नालीचे पालनपोषण केले. धोपावे खारवीवाडीतील सर्वजण स्वप्नालीला दिदी म्हणून हाक मारत. शांत स्वभावाची, सदा हसतमुख, घरी येणाऱ्या प्रत्येकाचे आदरातिथ्य करणारी दिदी वाडीत लाडकी होती. सर्वांना मदत करणारी दिदीने गुहागरमधील खरे ढेरे महाविद्यालयातून कला शाखेची पदवीही घेतली होती. गेली पाच वर्ष दिदी आजारी होती. औषधोपचार सुरु होते. संसारे कुटुंबाने स्वप्नाली बरी होण्यासाठी मुंबईपर्यंत धाव घेतली होती. गावातील प्रत्येकजण दिदी बरी व्हावी म्हणून देवाजवळ प्रार्थना करत होता. पण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी 16 मे 2021 रोजी दिदी सर्वांना सोडून देवाघरी गेली. संसारे कुटुंबाबरोबर वासुदेव गुडेकर कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळला. सारी खारवीवाडी नि:शब्द झाली. आबाल वृध्दांच्या डोळ्यात अश्रु दाटले होते.
नियतीचा खेळ मान्य करत हे दु:ख सर्वजण पचवत होते. लपवत होते. दिदीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर संसारे, गुडेकर कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्यासाठी सारा गाव लोटला.
हिंदु परंपरेप्रमाणे निधन झालेल्या व्यक्तीचा दशक्रिया विधी आणि उत्तरकार्य केले जाते. काही समाजात हे दोन्ही विधी एकाच दिवशी केले जातात. उत्तर कार्याच्या दिवशी दुखवटा काढण्याचा कार्यक्रम असतो. ज्याला पगडी बांधणे असेही म्हटले जाते. खारवी समाजामध्ये पगडी बांधण्याच्या दिवशी भावकीतील लोक निधन झालेल्या कुटुंबाला आपापल्या ऐपतीप्रमाणे पैसे देतात. या परंपरेप्रमाणे संसारे कुटुंबात दशक्रिया व उत्तर कार्याचा विधी एकाच दिवशी होता. कै. स्वप्नाली सर्वांचीच लाडकी असल्याने दुखवटा काढण्याच्या दिवशी संसारेंच्या घरी संसारे, गुडेकर नातेवाईकांसह सारा गाव जमला. प्रत्येकाने आपल्याला ऐपतीप्रमाणे पंढरी संसारेंना भेट दिली. स्वप्नाली आपली मुलगी असली तरी ती गावाची दिदी होती. दिदीच्या जाण्याने प्रत्येक घर दु:खात होते. अशावेळी तिच्या निधनानंतर लोकांनी दिलेले पैसे आपण ठेवून काय करायचे. असा विचार एका बोटीवर खलाशी म्हणून काम करणाऱ्या पंढरी संसारेंनी केला. हा विचार नातलगांना सांगितला. सर्वांची सहमती झाल्यावर पंढरी संसारे यांनी दुखवट्याच्या दिवशी मिळालेले पैसे दिदीच्या स्मरणार्थ दान केले. संसारे कुटुंबाने रु. 5 हजार धोपावेतील जिल्हा परिषद शाळेला दिले. रु. 5 हजार जगद्गुरु नरेंद्रमहाराजांच्या नाणीज संस्थानला दिले. तर 20 हजार रुपये धोपावे खारवीवाडी सातत्याने समाजोपयोगी काम करणाऱ्या कालिकामाता जनजागृत मंडळाला दिले.